येथे घेता येते अंजनी मातेसह बालहनुमानाचे दर्शन


भारतभर आणि परदेशातही महाबली हनुमानाची शेकड्याने मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिराचे काही वैशिष्ठ आहे. हनुमान ही संकटमोचन देवता. हनुमांच्या विविध रूपांचे दर्शन मंदिरातून होते मात्र बाल हनुमानाची प्रतिमा फारशी कुठे पाहायला मिळत नाही. हनुमान भक्तांना बालहनुमानाचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यासाठी रामाच्या अयोध्या नगरीला भेट द्यावी लागेल.

शरयू नदीकाठी वसलेल्या रामरायाच्या अयोध्या नगरीत हनुमान गढी मंदिर आहे. छोट्याश्या टेकडीवर असलेल्या या मंदिरात जाण्यासाठी ७८ पायऱ्या चढाव्या लागतात. येथे एक गुहा आहे. असे सांगतात कि लंकापती रावणाचा वध करून सीतामाईची सुटका केल्यावर वनवास संपवून राम जेव्ह्या अयोध्येला परतले तेव्हा त्यांनी भक्त हनुमानासाठी ही जागा दिली. तसेच हनुमानाला वर दिला कि जे भक्त अयोध्येत दर्शनासाठी येतील ते प्रथम हनुमानाचे दर्शन करतील. अन्यथा त्यांना यात्रेचे पुण्य मिळणार नाही. आजही रामजन्मस्थळ रामकोटचे रक्षण हनुमान करतात असा भाविकांचा विश्वास आहे.

मुख्य मंदिरात हनुमानाची आई अंजनीची मूर्ती असून तिच्या मांडीवर बालहनुमान आहेत. या मंदिरात भाविकाने व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होते असाही समज आहे. या मंदिराच्या भिंतीवर हनुमान चालीसा लिहिले गेले असून या मंदिराजवळ जांबुवंत, सुग्रीव यांचे तसेच रामाचा भव्य महाल होता असेही सांगितले जाते.

मोगल नबाब मन्सूर अली याचा मुलगा आजारी पडला तेव्हा त्याने मुलगा वाचवा म्हणून हनुमानाला नवस केला. मुलगा वाचला तेव्हा त्याने या मंदिराच्या जीर्णोद्धार केलाच पण या मंदिरावर कुणी राजा अथवा शासक त्याचा अधिकार गाजवू शकणार नाही असा ताम्रपट कोरला. या मंदिराला देणगी देणाऱ्यावर कोणताही कर लावला जाणार नाही असा आदेशही या नाबबाने दिला होता.

Leave a Comment