ब्रिटीश शाही परिवारजनांच्या नावांचे हे आहेत इतिहास


ब्रिटनच्या शाही घराण्यामध्ये नवे बाळ जन्माला आले, की घराण्यातील पूर्वजांची नावे त्याला देण्याचा शिरस्ता राजघराण्यामध्ये गेल्या अनेक पिढ्या पाळला जात आहे. ह्या राजघराण्यामध्ये जन्मलेल्या पाच स्त्रियांची नावे ‘ एलिझाबेथ’ असून, राणी एलिझाबेथचे पती प्रिन्स फिलीप ह्यांच्या नावावरून तीन मुलांची नावे ठेवली गेली आहेत. प्रिन्स विलियम आणि केट ह्यांना नुकतेच तिसरे अपत्य झाले असून, त्याचे नाव काय ठेवले जावे ह्या निर्णयाप्रत येण्यास त्यांना पाच दिवसांचा अवधी लागला. अखेरीस नव्या बाळाचे नाव लुईस ठेवण्यात आले. ह्या घराण्यातील प्रत्येक नावामागे एक इतिहास आहे, प्रत्येक नावाला एक खास अर्थ आहे.

राणी एलिझाबेथचे पूर्ण नाव एलिझाबेथ अॅलेक्झान्ड्रा मेरी असून, तिला महाराणी दुसरी एलिझाबेथ ह्या नावाने ओळखले जाते. एलिझाबेथचे नाव तिच्या आई एलिझाबेथच्या नावावरून ठेवलेले आहे. राणीचे आजोबा सातवे एडवर्ड ह्यांचा विवाह डेन्मार्कची राजकन्या प्रिन्सेस अॅलेक्झान्ड्रा ह्यांच्याशी १८६१ साली झाला. त्यांना सहा अपत्ये झाली. आजीची आठवण म्हणून राणीला अॅलेक्झान्ड्रा हे दुसरे नाव देण्यात आले. राणीचे तिसरे नाव मेरी हे तिचा वडिलांच्या आईच्या ( मेरी ऑफ टेक )नावावरून देण्यात आले आहे. राणी एलिझाबेथचे ज्येष्ठ पुत्र प्रिन्स चार्ल्स ह्यांचे संपूर्ण नाव चार्ल्स फिलीप आर्थर जॉर्ज असून, चार्ल्स नावाचा अर्थ ‘स्वतंत्र व्यक्ती’ असा आहे. चार्ल्स ह्यांचे दुसरे नाव ‘फिलीप’ हे त्यांच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, तर आर्थर हे त्यांचे तिसरे नाव पुराणकाळातील किंग आर्थर ह्यांच्या नाववरून ठेवण्यात आले आहे. राणीचे वडील किंग जॉर्ज ह्यांच्या नावावरून चार्ल्स ह्यांचे जॉर्ज हे नाव ठेवण्यात आले आहे.

ब्रिटीश घराण्याचे राजपुत्र प्रिन्स विलियम ह्यांचे संपूर्ण नाव विलियम आर्थर फिलीप लुईस असून, विलियम हे त्यांचे नाव त्याची आई प्रिन्सेस डायनाने ठेवलेले आहे. विलियम हे नाव ब्रिटीश राजघराण्यामध्ये फारसे ऐकिवात नव्हते. आर्थर हे विलियमचे दुसरे नाव आहे. राणीचे पती प्रिन्स फिलीप ह्यांच्या नावावर विलीयामचे तिसरे नाव असून ‘महायोद्धा’ या अर्थाचे लुईस हे नाव विलियमचे चौथे नाव आहे. विलियमचा थोरला मुलगा जॉर्ज ह्याचे संपूर्ण नाव जॉर्ज अॅलेक्झान्डर लुईस असून जॉर्ज हे त्याचे नाव राणीच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. अॅलेक्झान्डर हे त्याचे दुसरे नाव राणीच्या ‘अॅलेक्झान्ड्रा’ नावावरून ठेवण्यात आले आहे, तर लुईस हे त्याचे तिसरे नाव प्रिन्स विलियमच्या तिसऱ्या नावावरून देण्यात आले आहे.

विलियमची मुलगी शार्लोट हिचे संपूर्ण नाव शार्लोट एलिझाबेथ डायना असून, शार्लोट नावाचा अर्थ ‘स्वतंत्र’ असा आहे. शार्लोटचे दुसरे नाव राणी एलिझाबेथच्या नावावरून ठेवले गेले असून, तिसरे नाव हे विलीयमची आई प्रिन्सेस डायना हिच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. विलियम आणि केटच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलाचे नाव लुईस आर्थर चार्ल्स ठेवले गेले आहे. लुईस हे नाव विलियम आणि जॉर्जलाही दिले गेले आहे, त्याचप्रमाणे ह्या नवजात बाळाला देखील दिले गेले आहे. बाकी दोन्ही नावे त्याचे वडील विलियम आणि आजोबा चार्ल्स ह्यांच्या नावांवरून घेण्यात आली आहेत.

ब्रिटीश घराण्याचे राजकुमार प्रिन्स हॅरी ह्यांचे नाव हेनरी चार्ल्स अल्बर्ट डेव्हिड असून, हेनरी ह्या नावाचा अर्थ ‘ सत्ताधारी’ असा आहे. चार्ल्स हे दुसरे नाव हॅरीच्या वडिलांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे, तर अल्बर्ट हे राणी एलिझाबेथच्या वडिलांच्या नावांपैकी एक नाव होते. डेव्हिड ह्या नावाचा अर्थ ‘प्रिय’ अस असून सातवे एडवर्ड ह्यांच्या अनेक नावांपैकी हे एक नाव होते.

Leave a Comment