जानेवारी-मार्च तिमाहीत एसबीआयला ७ हजार कोटींचा तोटा


नवी दिल्ली – आर्थिक वर्ष २०१८ च्या जानेवारी-मार्च तिमाहीत देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाला मोठे नुकसान झाले आहे. ७,७१८.१७ कोटींचा तोटा बँकेला झाला असून एसबीआयला हा तोटा सतत वाढणाऱ्या एनपीएमुळे झाला आहे. याउलट तिसऱ्या तिमाहीत बँकेला २,४१६.३६ कोटींचे नुकसान झाले होते. २०१६-१७ च्या तिमाहीत एकूण २८१४.८२ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

बँकेचे जरी या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत नुकसान झाले असले तरी बँकेच्या एकूण उत्पन्नात वाढ झाली आहे. एसबीआयचे मागील वर्षी याच काळात एकूण उत्पन्न ५७,७२०.०७ कोटी होते. यावर्षी हा आकडा वाढून ६८,४३६.०६ कोटीवर गेला आहे. बँकेने वाढवलेले प्रोव्हिजनिंग असल्याचे एसबीआयला झालेल्या तोट्याचे कारण म्हटले जात आहे. बँकेच्या एप्रिल-मे-जून दरम्यान बुडालेल्या कर्जात वाढ होण्याची भीती असल्यामुळे प्रोव्हिजनिंग पूर्वानुमान लावून वाढवण्यात आले आहे. चौथ्या तिमाहीत प्रोव्हिजनिंग १८,८७६ कोटी रुपये होते. हे वाढून २८,०९६ कोटी रुपये झाले. चौथ्या तिमाहीत एसबीआयच्या ग्रॉस एनपीएमध्ये वाढ होऊन ते १०.३५ टक्क्यांवरून १०.९१ टक्क्यांवर पोहोचले.

वित्तीय मार्गदर्शक शरद कोहली यांनी याविषयी माहिती देताना सांगितले, की अशाप्रकारे सरकारी बँकेचे जेव्हा नुकसान होते, तेव्हा सरकारला मध्यस्थी करुन बँकेला वाचवण्यासाठी सरकारी खजिन्याचा वापर करावा लागतो. याचा थेट परिणाम सामान्य माणसाच्या खिशावर पडतो. यासोबतच कोहली यांनी सांगितले, की सरकारी बँकांमध्ये कर्जबुडीच्या घटना मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यामागचे कारण म्हणजे कर्ज घेणाऱ्याची योग्य पडताळणी न करणे किंवा लाचखोरीच्या मार्गाने कर्ज देणे. हे भ्रष्टाचाराचेच एक रूप असल्याचे कोहली यांनी सांगितले.

Leave a Comment