वैयक्तिक माहितीची चोरी – 44 लाख आयफोन वापरकर्त्यांचा गुगलवर खटला


वापरकर्त्यांची वैयक्तिक माहिती बेकायदेशीरित्या मिळवून त्यांच्या खासगीपणाचा भंग केल्याबद्दल ब्रिटनमधील 44 लाख आयफोन वापरकर्त्यांनी गुगलवर खटला भरला आहे. या वापरकर्त्यांनी 4.3 अब्ज डॉलर्सची नुकसानभरपाई मागितली असून ती मंजूर झाली तर प्रत्येकाला $1000 मिळतील.

गुगल यू ऑव अस या नावाने हे सर्व वापरकर्ते एकत्र आले आहेत. गुगलने 2011 ते 2012 या काळात त्यांची माहिती चोरल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे. आयफोन मधील सफारी ब्राऊझरमध्ये कुकीजच्या माध्यमातून माहिती मिळविण्यास प्रतिबंध केला जातो. मात्र गुगलने अल्गोरिथमचा वापर करून त्यावर मात केली आणि त्याद्वारे वापरकर्त्यांची माहिती त्यांच्या परवानगीवाचून मिळविणे शक्य झाले. सफारी वर्कअराऊंड या नावाने ओळखले जाणारे हे प्रकरण 2012 साली उघड झाले होते.

ब्रिटनमधील न्यायालयात आता या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे, मात्र सफारी वर्कअराऊंडचा कुठल्याही वापरकर्त्यावर परिणाम झाला नसल्याचा दावा गुगलने केला आहे. “हे प्रकरण सहा वर्षांपूर्वीचे आहे आणि आम्ही त्याच वेळेस त्याच्यावर उपाय केला होता. त्यात काही दम नाही आणि ते बरखास्त करावे, असे आम्हाला वाटते,” असे गुगलचे कम्युनिकेशन्स डायरेक्टर टॉम प्राईस म्हणाले.

Leave a Comment