इंधन दरवाढीमुळे जीवनावश्यक वस्तू महागणार!


नवी मुंबई : कर्नाटक निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचे दर सलग दहाव्या दिवशी वाढले असून इंधनाचे दर पैशात वाढत असले, तरी त्याचा परिणाम रुपयात होत असल्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर ८४ रुपये ७३ पैसे तर डिझेलचे दर ७२ रूपये ३६ पैसे झाले आहेत.

वाहनधारकांना डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ झाल्याने याचा फटका बसत असल्यामुळे आपल्याला आता भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगत ट्रान्सपोर्ट असोसिएशनने २० ते ३० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही भाडेवाढ येत्या शुक्रवारी होणार असल्याने याचा थेट परिणाम जीवनावश्यक वस्तूंवर होणार आहे.

भाजीपाला, फळे, कांदा, बटाटा, अन्नधान्य यांच्या किंमतीत वाढ होणार आहे. याचा परिणाम म्हणजे महागाई गगनाला भिडणार आहे. दुसरीकडे वाढलेले भाडे शेतकऱ्यांच्या खिशातून जाणार असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे. मुंबई माल वाहतूक टेम्पो महासंघाची येत्या शुक्रवारी बैठक होणार आहे. यात २० ते ३० टक्के भाडेवाढ करण्यात येणार आहे. पेट्रोलजन्य पदार्थांबरोबर इन्शुरन्स, टायर किंमती वाढल्या असून चालकांचे पगारही वाढले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून भाडेवाढ न झाली असल्यामुळे आता भाडेवाढ केल्याशिवाय पर्याय नसल्याचं वाहनधारकांचे म्हणणं आहे.

Leave a Comment