जगात या बिझिनेसमध्येही मिळतो भरपूर पैसा


नोकरी किती नाही म्हटले तरी काही काळाने कंटाळवाणी होते आणि अनेकांच्या मनात स्वतःचा व्यवसाय असावा असे विचार घोळू लागतात. मित्रांबरोबर चर्चा होतात, अनेक कल्पना पुढे येतात. मात्र आपल्याला हे माहित नसते आपण कल्पना करू शकणार नाही असे अनेक व्यवसाय जगात सुरु आहेत आणि त्यातून भरपूर पैसा मिळविला जात आहे.

उदाहरण द्यायचे तर संपूर्ण पैसे परत देण्याच्या बोलीवर एक व्यवसाय सुरु आहे. या ऑनलाईन व्यवसायाचे नाव आहे रिझर्व अ स्पॉट इन हेवन डॉट कॉम. म्हंजे स्वर्गात जागा बुक करा आणि नाही मिळाली तर भरलेले सगळे पैसे म्हणजे १५ डॉलर्स परत. येथे तुम्ही १५ डॉलर्स भरले कि तुम्हाला स्वर्गात तुमची जागा रिझर्व झाल्याचे सर्टीफिकेट मिळते, तेथपर्यंत कसे जायचे त्याची माहिती आणि आयकार्ड दिले जाते. तुमची राखीव जागा तुम्हाला सापडली नाही तर सगळे पैसे परत करण्याची हमी आहेच.


बटाटा हा व्यवसायाचा एक अनोखा मार्ग ठरला आहे. आजकाल शुभेच्छा पत्रे पाठविण्याच्या फंदात पडत नाही कारण इंटरनेटवर ते काम होते. पण तरीही तुम्हाला कुणाला खास संदेश पाठवायचा असेल तर पोटॅटो पार्सल कंपनी तुमच्या मदतीसाठी सज्ज आहे. येथे तुम्ही बटाट्यावर हवा तो संदेश लिहून पाठवू शकता. जेवढा संदेश मोठा तेवढा बटाटा मोठा आणि किंमतही मोठी.


चिकन खाण्याची आवड अनेकांना असते पण कोंबड्या पालन त्यांना माहिती नसते. रेंट अ चिकन या नावाने चालविली जाणारी एक कंपनी तुम्हाला कोंबड्याची एक जोडी आणि एक माणूस घरी पाठवून कोंबडी पालनाचे धडे देते मग घरच्या अंडी आणि कोंबड्याचा स्वाद तुम्ही चाखू शकता.


दमूनभागून घरी आल्यावर आपल्या जीवलगाच्या कुशीत घेतलेली मस्त झोप दुसऱ्या दिवसासाठी उत्साहवर्धक ठरते हे खरे असले तरी अनेकदा काही कारणाने बॉयफ्रेंड किंवा जिवलग दूर गेलेला असला तर पंचाईत होते. रात्र तळमळत काढावी लागू नये म्हणून एक कंपनी तुमची काळजी घेते. हि कंपनी तुम्हाला बॉयफ्रेंड पिलो नावाची उशी विकत देते. हि उशी तुमच्या बॉयफ्रेंडच्या शरीराच्या आकारात येते. ती ऑनलाईन मिळू शकते. बॉयफ्रेंड दूर असेल तर हि उशी तुम्ही वापरू शकता.

Leave a Comment