दुधवा नॅशनल पार्क मध्ये पहा पक्ष्यांची रंगबिरंगी दुनिया


नैसर्गिक, साहसी, धार्मिक पर्यटन आपण बरेचदा करतो. जंगल सफारी या पर्यटनाचा आणखी एक पर्याय. हे पर्यटनही अतिशय आनंदी होते कारण यात आपण वन्य पशु तसेच विविध वृक्षसंपदा आणि नाना रंगी पक्षी दुनिया अनुभवतो. आपल्या जगापेक्षा वेगळे असे हे जग पाहणे, अनुभवाने हा निराळा रोमांच असतो. विविध जातीचे ४५० हून अधिक पक्षी पाहायचे असतील आणि वाईल्डलाईफ फोटोग्राफीची हौस भागवायची असेल तर दुधवा नॅशनल पार्कला भेट द्यायलाच हवी.


भारत नेपाळ सीमेवर उत्तरप्रदेशच्या तरी बेल्ट मध्ये १९५८ मध्ये वाइल्डलाइफ सँक्चुरी म्हणून स्थापना झालेले हे अभयारण्य १९७७ मध्ये राष्ट्रीय उद्यान म्हणून घोषित केले गेले आहे. येथे वाघ, तरस, बारासिंगे, हरणे, अस्वले, देवखारी, मगरी असे वन्य पशु जसे आहेत तसेच येथे ४५० हून अधिक जातीचे पक्षी पाहायला मिळतात. फुलपाखरांची एक अनोखी दुनिया येथे आहे. भारतीय महाद्वीपात पक्ष्यांच्या १३०० जाती आढळतात त्यातील ४५० येथे पाहायला मिळतात. सहसा न दिसणारा गरुड, स्वर्गीय नर्तक, सुतार पक्षी येथे दिसतातच पण थंडीत येणाऱ्या प्रवासी पक्षांनी हे जंगल गजबजून जाते.

हे जंगल इतके दाट आहे कि थंडीत येथील वन्य प्राणी उन्हे खाण्यासाठी चक्क उघड्यावर येतात. माखुमा ओढ्याकाठी मगरी पहुडलेल्या असतात. मात्र हे अभयारण्य दिवसाउजेडीच पाहायला हवे. रात्री पुरेशी सुविधा येथे नाही. येथे दरवर्षी बर्ड फेस्टिवल आयोजित केला जातो. या अभयारण्याला भेट देण्याची योग्य वेळ डिसेंबर ते मार्च अशी आहे.

Leave a Comment