आपल्या भारताची वैविध्यपूर्ण खाद्यसंस्कृती


भारत हा विविधतेने नटलेला देश असून ह्या देशामध्ये अनेक संस्कृती, परंपरांचे पालन करणारे विविध प्रांतांतील लोक एकत्र नांदत आहेत. लोक जरी वेगवेगळ्या प्रांतांतील असले, तरी ह्यांना एकत्र आणले येथील खाद्यसंस्कृतीने. ह्या खाद्य संस्कृतीमध्ये एकच पदार्थ तीन वेगवेगळ्या प्रांतांमध्ये निरनिराळ्या पद्धतीने बनविला जात असतो. प्रत्येक प्रांताची खाद्यसंस्कृती निराळी, पदार्थ बनविण्याची, खाण्याची तऱ्हा निराळी. आपल्या देशामध्ये पदार्थांची इतकी विविधता आहे, की ते सर्व चाखून पाहायचे म्हटले तरी अनेक महिन्यांचा कालवधी लागेल. म्हणूनच अस्सल खवैय्यांसाठी भारत भ्रमण करीत निरनिराळ्या स्थानिक पदार्थांचा आस्वाद घेणे ही एक अपूर्व पर्वणी आहे. आपल्या खाद्यसंस्कृतीतील ही विविधता लक्षात घेऊनच, ती दर्शविणारी आकर्षक पोस्टर्स विदेश मंत्रालयातर्फे प्रदर्शित करण्यात आली आहेत. ह्या पोस्टर्सद्वारे प्रत्येक राज्याची खाद्यसंस्कृती दर्शविण्यात आली आहे. ह्यातील काही प्रांतांच्या खाद्य संस्कृतींची खासियत काय आहे ते जाणून घेऊ या.

आंध्र प्रदेशची खासियत अनेक मसाल्यांचे मिश्रण असलेले, लाल मिरच्यांचा भरपूर वापर करीत तयार करण्यात येणारे पदार्थ. येथील पदार्थ साधेच पण अतिशय रुचकर आहेत. रसम, निरनिराळ्या चटण्या, वडे, भात इत्यादी ह्या भोजनाची खासियत आहे. टोमाटो आणि लाल मिरच्यांची चटणी, भात, मांस, वाफविलेल्या भाज्या अरुणाचल प्रदेशातील भोजनाची खासियत आहे. ह्यामध्ये चीज आणि सोयाबीन्सचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. आसामकडील थाळीमध्ये एखादा मांसाहारी पदार्थ, भाज्या, ‘आलू पिटिका’, दाल आणि पालेभाज्या सर्वसाधारणपणे पाहायला मिळतात. कबाब, बोटी, चिकन मसाला, सत्तुचे पराठे, ‘चोखा आणि लीट्टी’ , फिश करी, पोस्ता दाना हलवा, ही बिहार कडील खासियत आहे.

छत्तीसगडची खासियत आहेत ‘राखीया बडी’, पेठा, तांदुळाच्या पीठाची भजी, बफौरी, भात, फारा( भाताची भजी ) हे पदार्थ, तर भात, अनेक प्रकारचे सी फूड, विंदालू, सोल कढी, केळ्याचा शिरा, ही खासियत आहे गोव्याची. गुजराती थाळी म्हटली, की जिभेवर आंबट-गोड चव रंगाळू लागते. मेथीचे ठेपले, बाजरीची भाकरी, गोड वरण, आलू रसिला, खिचडी, वालाची उसळ, तुरीच्या डाळीची पुरणपोळी, हे पदार्थ हमखास पाहायला मिळतात. हरियाणामध्ये घरचे ताजे लोणी, ‘काचरी की सब्जी’, खिचडी, बाजरीची भाकरी किंवा मिस्सी रोटी, ताजे ताक, कढी-पकोडे हे पदार्थ हवेतच. हिमाचल मधील पदार्थ तिखट, मसालेदार असून, उसळी, भाज्या, सिदू नामक पोळीसारखा पदार्थ, सुका मेवा घातलेला गोड भात ही तिथली खासियत आहे. जम्मू आणि काश्मीर ची खासियत आहे रोगन जोश, यखिनी पुलाव, हरीश्ता, अक्रोडाची चटणी, आणि काश्मीरचा सुप्रसिद्ध कहवा.
चील्ल्का, धुस्का, कुर्थी दाल, लाल भात, लाल माठाची भाजी, देहाती चिकन, दुध पीठा, सत्तू पराठा, घुग्नी हे झारखंडमध्ये बनविले जाणारे खास पदार्थ आहेत. तर निरनिराळ्या प्रकारचे भात, अक्की रोटी, दाल, भाज्या, रसम, सांबार, कोशिंबीर, रवा केसरी ( शिरा) ही कर्नाटकाची खासियत आहे. नारळाच्या तेलामध्ये बनविले गेलेले अवियल आणि गोड पायसम हे केरळी खासियत आहेत. पुरणपोळी, मसालेभात, आमटी, कोशिंबीर, बासुंदी, श्रीखंड ही खासियत आहे महाराष्ट्राची. सरसो दा साग, मक्की दी रोटी, तंदुरी चिकन, छोले, दाल मखनी पंजाबचे खास पदार्थ आहेत.

Leave a Comment