निपाह व्हायरसने ग्रस्त असल्याची लक्षणे, आणि त्यापासून बचाव


केरळ राज्यामध्ये निपाह व्हायरस मुळे इन्फेक्शन होऊन अनेक लोक मृत्युमुखी पडले आहे, तर काहींची स्थिती अतिशय गंभीर आहे. ह्या व्हायरसचे संक्रमण अतिशय झपाट्याने होत असून, हा अतिशय झपाट्याने फैलावत आहे. हे पाहून केंद्र सरकारच्या वतीने नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल तर्फे एका पाहणी गटाची पाठवणी कोहीकोड येथे करण्यात आली आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या नुसार निपाह व्हायरस हा नव्याने उत्पन्न झालेला (‘zoonosis’) असून, ह्याद्वारे मनुष्यामध्ये ‘अक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम’ आणि एन्सीफलायटीस सारखी प्राणघातक लक्षणे दिसून येतात. प्राण्यांपासून मनुष्याला होऊ शकणाऱ्या रोगाला zoonosis म्हटले जाते.

निपाह व्हायरसपासून उद्भविणाऱ्या इन्फेक्शनसाठी अद्याप कोणत्याही प्रकारचे औषध किंवा लस उपलब्ध नाही. ह्यासाठी जी लक्षणे दिसतील त्याप्रमाणे उपचार केले जातात. हा रोग मुख्यत्वे डुकरांच्या माध्यमातून फैलावतो. तसेच वटवाघुळे ( फ्रुट बॅटस् ) देखील हा व्हायरस फैलावण्यास कारणीभूत आहेत. सध्या ह्या इन्फेक्शनने ग्रस्त पेशंट पाहणाऱ्या डॉक्टर्सच्या मते हा व्हायरस हवेतून फैलावणारा नाही. पण ज्यांना इन्फेक्शन झाले आहे, त्यांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस फैलावू शकतो. ह्या व्हायरसने ग्रस्त रुग्णाला डोकेदुखी, ताप, उलट्या होणे, सुस्ती येणे, वागण्या-बोलणण्यामध्ये असंबद्धता असणे, ( abnormal behaviour ) अशी लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे दोन ते तीन आठवड्यांपर्यंत दिसू शकतात. अशी लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांकडे जाणे अत्यावश्यक आहे. हा रोग अतिशय कमी काळामध्ये गंभीर स्वरूप धारण करीत असल्याने ह्यासाठी त्वरित उपाययोजना करण्याची आवश्यकता असते.

हा रोग, रुग्णाच्या संपर्कात ( through body fluids ) आल्याने फैलावत असल्याने रुग्णाशी थेट संपर्क टाळायला हवा. ह्यासाठी रुग्णाला ‘क्वारंटीन’, म्हणजेच इतरांच्या संपर्कात येण्यापासून रोखणे अत्यावश्यक आहे. जर हे शक्य नसेल, तर रुग्णाच्या संपर्कात येण्याऱ्या व्यक्तीने वारंवार स्नान करून स्वतःला निर्जंतुक करायला हवे. तसेच रुग्णासोबत असताना मास्कचा वापर करावा, व हात वारंवार धूत रहावे. कोणत्याही पक्ष्याने खाऊन पाडलेले फळ खाऊ नये. तसेच ताडी, किंवा नीराचे सेवन करू नये. ह्या झाडांवर ‘फ्रुट बॅटस्’ चा वावर जास्त असल्याने नीरा किंवा ताडीतून रोगाचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते.

ह्या रोगाने ग्रस्त रुग्णांच्या सेवेसाठी विशेष मेडिकल कँप्स लावले जात असून, कोहीकोड येथे विशेष कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment