स्विमिंग पूलच्या पाण्यातील रसायनांपासून असे करा त्वचेचे रक्षण


पोहणे हा व्यायाम लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना फायद्याचा असा आहे. विशेषतः वृद्ध मंडळी, संधिवाताचे रुग्ण, गर्भवती महिलांसाठी हा व्यायाम विशेष लाभकारी आहे. ह्या व्यायामाने शरीर ससुदृढ होतेच, शिवाय मन शांत होऊन एकाग्रता वाढण्यास मदतही होते. खासकरून मुलांच्या शाळांना किंवा कॉलेजना उन्हाळ्याच्या सुट्ट्या सुरु झाल्या की पोहायला जाण्याचा कार्यक्रम रोजच्या दिनक्रमामध्ये आवर्जून समाविष्ट होतो. हा व्यायाम अतिशय फायद्याचा असला, तरी याबाबतीत काही गोष्टी लक्षात घेणे अगत्याचे आहे. स्विमिंग पूलमध्ये, त्यातील पाणी किटाणूरहित ठेवण्यासाठी अनेक रसायनांचा वापर केला जात असतो. ह्या रसायनांचे दुष्परिणाम आपल्या त्वचेवर होऊ नयेत यासाठी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः लहान मुलांची त्वचा अतिशय नाजूक असल्याने त्यांच्या बाबतीत विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

स्विमिंग पूलचे पाणी किटाणूरहित ठेवण्यासाठी त्यामध्ये क्लोरिनचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. पण हे क्लोरीन आपल्या त्वचेच्या किंवा केसांच्या संपर्कात आल्यानंतर त्याच्यापासून ‘disinfection byproducts’ तयार होत असतात. ही बाय-प्रोडक्ट्स क्लोरीनपेक्षा जास्त हानिकारक असतात. ह्यांच्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते, सेन्ट्रल नर्व्हस सिस्टम कमकुवत होऊ शकते, आणि कार्डियो व्हॅस्क्युलर सिस्टमवरही ह्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. जी मुले दीर्घकाळ क्लोरीनच्या संपर्कात येतात, त्यांना श्वास लागणे, डोळ्यांची जळजळ होणे, त्वचेची आग होणे, पोट बिघडणे, अश्या समस्या उद्भवू शकतात. ह्या शक्यतांमुळे पालकांनी, किंवा पोहायला जाणाऱ्यांनी घाबरून न जाता, अश्या समस्या उद्भवू नयेत ह्या करिता काय उपाय अवलंबले जाऊ शकतात ह्याबद्दल माहिती करून घेणे आवश्यक आहे.

पोहायला जाण्यासाठी शक्यतो ‘आउट डोअर’ म्हणजे खुल्या स्विमिंग पूलची निवड करावी. तसेच क्लोरीनच्या ऐवजी खारे पाणी, यू.व्ही किंवा आयोनायझेशन वापरून पूलचे पाणी स्वच्छ ठेवले जात असणाऱ्या पूलची निवड करा. पोहण्यासाठी स्पँडेक्स किंवा नायलॉनने बनविलेले पोशाख वापरण्याऐवजी पॉलीयेस्टरने बनलेले स्विमिंग सूट्स वापरावेत. हे पोशाख जास्त काळ टिकून राहतीलच, त्याशिवाय पाण्यामधील क्लोरीन पासून त्वचेचे रक्षण अधिक उत्तम प्रकारे करू शकतील.

पोहणे झाल्यानंतर पूलमधून बाहेर आल्यावर त्वरित शॉवर घेणे आणि अंग व्यवस्थित धुणे अतिशय महत्वाचे आहे. काही जण पोहून बाहेर पडल्यावर लगेच कपडे बदलून तयार होतात. पण यामुळे पाण्यातील रसायने तुमच्या त्वचेवर तशीच राहतात. त्यामुळे पोहणे झाल्यावर त्वरित आंघोळ करणे आवश्यक आहे. ह्यासाठी बहुतेक सर्वच स्विमिंग पूल्स वर शॉवर उपलब्ध असतातच. पोहायला पूलमध्ये उतरण्यापूर्वी अंगाला, केसांना भरपूर खोबरेल तेल लावावे. ह्यामुळे पाण्यातील रसायनांमुळे आणि किटाणूंमुळे त्वचेवर इन्फेक्शन होण्याचा धोका कमी होतो. त्याचप्रमाणे खास पोहण्याअगोदर लावण्यासाठी लोशन देखील बाजारामध्ये मिळते. त्याचा ही उपयोग करता येईल, किंवा त्वचेवर आणि केसांवर सी जीवनसत्व स्प्रे करता येईल.

पोहण्याआधी केसांना खोबरेल तेल लावल्याने आणि पोहून झाल्यानंतर केस स्वछ धुवून कण्डिशनर लावल्याने केसांना क्लोरीन पासून अपाय होत नाही. तसेच पोहण्यास जाण्यापूर्वी चांगल्या प्रतीच्या सनस्क्रीनचा वापर करावा. पाण्यातून बाहेर पडल्यानंतर ही क्लोरिनचा वास अंगाला, किंवा केसांना क्वचित कधीतरी येऊ शकतो. अश्या वेळी आंघोळीच्या पाण्यामध्ये लिंबाचा रस घालावा, व त्या पाण्याने आंघोळ करावी. पोहताना डोळ्यांमध्ये पाणी जाऊ नये या साठी चांगल्या प्रतीचे स्विमिंग गॉगल्स वापरावेत. तसेच पोहणे झाल्यानंतर स्वछ पाण्याने डोळे नीट धुवावेत. ह्या सर्व गोष्टी जर अवलंबल्या तर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये किंवा एरव्हीही पोहायला जाताना त्वचेवर किंवा केसांवर काही दुष्परिणाम होतील का ही काळजी न करता पोहण्याची मजा लुटता येईल.

Leave a Comment