हे आहे भारताचे प्राचीन, अमूल्य वैभव


भारताची संस्कृती अतिशय प्राचीन आहे, ह्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. ह्या संस्कृतीचे उदाहरण असलेल्या अनेक कलाकृती भारतभरातील ठिकठीकाणच्या वस्तू संग्रहालायांमध्ये आहेत. ह्यातील काही वस्तू जगभरामध्ये सर्वोत्तम, अमूल्य कलाकृती म्हणून प्रसिद्ध आहेत. ह्यांपैकी एक आहे ‘पल्लावरम’ नामक कुऱ्हाडीसम दिसणारे अवजार. ह्या कुऱ्हाडीचे पाते पाषाणांचे बनले असून, मानवी संस्कृतीचा पुरावा देणारे हे सर्वात प्राचीन हत्यार आहे. ह्याचा शोध मे १८६३ साली ब्रिटीश जियोलॉजिस्ट आणि पुरातत्ववेत्ते रॉबर्ट ब्रूस फूट ह्यांनी लावला. हे हत्यार चेन्नई जवळील पल्लावरम येथे सापडल्याने ह्याच ठिकाणचे नाव ह्या अवजाराला देण्यात आले. हे अवजार १७ मिलियन वर्षांपूर्वी अस्तित्वात असलेल्या मानवी वसाहतींचे प्रतिक आहे. सध्या चेन्नईमधील वस्तू संग्रहालयामध्ये हे अवजार पाहण्यास मिळते.

‘इंडस डान्सिंग गर्ल’ ह्या नावाने प्रसिद्ध असलेली ही मूर्ती सध्या नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियम येथे ठेवलेली आहे. मोहेंजोदारोच्या उत्खननामध्ये ही मूर्ती सापडली होती. ही मूर्ती नर्तकीची नसून एखाद्या राणीची किंवा तत्सम कुठल्या तरी स्त्रीची असावी असा इतिहासकारांचा कयास आहे. ‘दीदारगंज यक्षी’ ची भव्य पाषाणमूर्ती बिहारमधील पटनातील वस्तू संग्रहालयामध्ये ठेवण्यात आली आहे. मौर्य काळातील शिल्पकलेचे उदाहरण असलेली ही मूर्ती पाच फुट तीन इंच उंचीची आहे. हिच्या हातामध्ये चवरी आहे. एका अखंड दगडातून ही मूर्ती कोरलेली असून, मौर्य शिल्पकलेची खासियत असलेले मिरर पॉलिश ह्यावर आहे. ख्रिस्तपूर्व दुसऱ्या शतकामध्ये ह्या मूर्तीचे निर्माण झाले असावे असा पुरातत्ववेत्त्यांचा कयास आहे. पटनाजवळील दीदारगंज भागामध्ये १९१७ साली, गंगा नदीच्या तीरावर ही मूर्ती सापडली होती.

एके काळी अतिशय प्रसिद्ध असलेल्या आंध्र प्रदेशातील अमरावतीच्या स्तूपाचे अवशेष, भारतीय शिल्पकलेचा अप्रतिम नमुना मानले जातात. पाषाणमध्ये कोरलेल्या बुद्धांच्या जीवनकथा ह्या अवशेषांवर पाहायला मिळतात. ह्या स्तूपाचे अनेक अवशेष जगभरातील अनेक प्रसिद्ध वस्तूसंग्रहालायांमध्ये ठेवलेले आहेत. भारतामध्ये चेन्नई मधील सरकारी वास्तुसंग्रहालायामध्ये आणि कोलकाता येथील इंडियन म्युझियम मध्ये हे अवशेष पाहायला मिळतात.
गौतम बुद्ध ह्यांच्या पवित्र अस्थी असलेला कलश बिहारमधील पटना वस्तूसंग्रहालयामध्ये ठेवलेला आहे. वैशाली गावामध्ये असलेल्या स्तुपाखाली खोलवर दबलेला हा कलश १९५८-६१ ह्या काळामध्ये झालेल्या उत्खननात श्री अ स अल्तेकर ह्यांना सापडला होता. आता हा कलश पाहण्यासाठी पर्यटक आणि भाविकांची गर्दी येथे पाहायला मिळते. ह्या कलशासोबत एक पाषाणाचा मणी, एक काचेचा मणी, एक तांब्याचे नाणे, एक शंख, आणि एक लहानसे सुवर्णपत्र देखील ठेवलेले आहे.

सम्राट अकबराचे चिलखत मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळते. हे चिलखत सर रतन टाटा ट्रस्टच्या वतीने वस्तू संग्रहालयाला भेट देण्यात आले होते. कणखर पोलाद आणि सोन्याचा वापर करून तयार करण्यात आलेले हे चिलखत छाती, पोट, पाठ ह्या भागांसोबतच गळ्याला आणि मानेला देखील संरक्षण देईल अश्या पद्धतीने बनविण्यात आले आहे. ह्या चिलखताच्या आतल्या भागावर ते चिलखत अकबराचे असल्याचा लेखी उल्लेख आहे. पुण्यातील राजा केळकर वस्तूसंग्रहालयामध्ये मस्तानी महालातील एका कक्षाची प्रतिकृती तयार करण्यात आली आहे. हा महाल पूर्वी पुणे शहराच्या कोथरूड भागामध्ये असून, काळाच्या ओघामध्ये ह्याची पुष्कळ पडझड झाली होती. डॉक्टर केळकरांनी हे अवशेष हस्तगत करून ह्या महालाची प्रतिकृती केळकर वस्तूसंग्रहालयामध्ये उभी केली.

Leave a Comment