केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी अवलंबा हे घरगुती उपाय


केसांमध्ये कोंडा होणे ही केसांशी निगडीत एक सामान्य समस्या आहे. केसांच्या मुळाशी असलेली त्वचा आर्द्रताहीन, कोरडी होऊ लागली, किंवा त्यामध्ये बॅक्टेरियाचा प्रादुर्भाव होऊ लागला, फंगल इन्फेक्शन होऊ लागले, की कोंडा होऊ लागतो, व त्यामुळे डोक्यात सतत खाज सुटू लागते. पांढऱ्या गव्हाच्या कोंड्याप्रमाणे केसांतील कोंडा दिसतो. थोड्या प्रमाणात केसांमध्ये कोंडा असणे हे जरी सामान्य असले, तरी काहींच्या केसांमध्ये अति प्रमाणात कोंडा दिसून येतो. हा कोंडा त्यांच्या केसांमधून पडून कपड्यांवरही दिसू लागतो. कोरडी त्वचा, मानसिक ताण, हार्मोन्सचे असंतुलन, तेलकट त्वचा, अपथ्य अश्या अनेक कारणांमुळे कोंडा होत असला, तरी शास्त्रज्ञांच्या मते कोंडा होण्याचे मुख्य कारण म्हणजे केसांच्या मुळाशी असलेल्या त्वचेवर फंगल इन्फेक्शन होणे, हे आहे. ह्यामध्ये चांगली गोष्ट अशी, की काही घरगुती उपायांचा अवलंब करून केसांतील कोंड्याची समस्या दूर करता येऊ शकते.

एक कप ग्रीन टी बनवून घेऊन त्यामध्ये दोन तीन थेंब पेपरमिंटचे तेल घालावे. त्यामध्ये एक चमचा व्हिनेगर घालून हे मिश्रण थंड होऊ द्यावे. केस ओले करून घेऊन त्यावर हे थंड मिश्रण ओतावे व त्याने पाच मिनिटे केसांच्या मुळांशी मालश करावी. त्यानंतर सल्फेट-फ्री शॅम्पूचा वापर करून केस स्वच्छ धुवावेत. तसेच थोडी कडूनिंबाची पाने धुवून घेऊन पाच ते सहा कप गरम पाण्यामध्ये रात्रभर भिजवून ठेवावीत. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पाणी गाळून घेऊन ह्या पाण्याने केस धुवावेत. तसेच कडूनिंबाच्या पानांची पेस्ट करूनही केसांना लावल्यास केसांतील कोंडा कमी होतो.

बाजारामध्ये अनेक औषधी शॅम्पू खास कोंडा हटविण्याकरिता उपलब्ध आहेत, त्यांचा ही वापर केसांतील कोंडा हटविण्यासाठी करता येईल. तसेच दोन अॅस्पीरीन च्या गोळ्या चुरून घेऊन त्या थोड्याश्या शॅम्पूमध्ये मिसळाव्यात व ह्याने केस धुवावेत. त्याने ही केसांतील कोंडा कमी होण्यास मदत होते. अॅपल सायडर व्हिनेगर पाण्यामध्ये मिसळून त्याने केस धुतले असताही कोंडा कमी होतो. तसेच लिंबाचा रस किंवा दही केसांच्या मुळांशी लावल्यानेही कोंडा कमी होण्यास मदत होते. केसांच्या मुळांशी असलेली त्वचा कोरडी पडू नये ह्या करिता खोबरेल तेलाने नियमित मालिश करावी.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment