उत्तम आरोग्याकरिता आस्वाद घ्या लीचीचा


उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आंबे, जांभळे, ह्यांच्या जोडीने आणखी एक चविष्ट फळ दिसते, ते म्हणजे लीची. हे फळ अतिशय चविष्ट आहेच, पण त्याच बरोबर हे आरोग्याच्या दृष्टीने देखील लाभकारी आहे. ह्यामध्ये कर्बोदके, अ, क, बी कॉम्प्लेक्स जीवनसत्वे, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फोरस, लोह आणि क्षार आहेत. ही सर्व तत्वे शरीर निरोगी, सुदृढ ठेवण्यास आवश्यक आहेत. मात्र लीची खाताना एक गोष्ट आवर्जून लक्षात ठेवायला हवी, ती ही, की ह्याचे अतिप्रमाणात केले गेलेले सेवन नुकसानकारक ठरू शकते.

लीचीमध्ये बीटा कॅरोटीन आणि ओलीगोनॉल असते. ही दोन्ही तत्वे हृदय बळकट ठेवण्यासाठी आवश्यक आहेत. त्यामुळे ज्या व्यक्तींना हृदयाशी निगडीत विकार असतील, त्यांनी लीचीचा समावेश आपल्या आहारामध्ये अवश्य करावा. पोटासंबंधी विकार दूर ठेवण्यासही लीची सहायक आहे. ह्या फळाच्या सेवनाने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते. तसेच ज्यांना बद्धकोष्ठाचा त्रास असेल, त्यांनी ह्याचे सेवन अवश्य करावे. लीची वजन नियंत्रित ठेवण्यासही सहायक आहे. ज्या व्यक्तींना वजन घटवायचे असेल त्यांनी आपल्या आहारामध्ये लीचीचा समावेश करावा आणि सकाळच्या वेळी लीचीचे सेवन करावे. ह्यामध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पोट जास्त काळ भरलेले राहून वारंवार भूक लागणे कमी होते.

लीची शरीरातील उष्णता कमी करण्याच्या कामी सहायक आहे. उन्हाळ्यामध्ये शरीरातील पाणी घामावाटे बाहेर पडत असते. शरीरामध्ये होणारी ही पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी लीची सहायक आहे. तसेच शरीरामध्ये कर्करोग फैलावणाऱ्या कोशिकांचा नाश करण्याच्या कामी देखील लीची सहायक आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment