कहाणी भारतातील एका बोगद्याची आणि त्यातील भुताची !


कधी कधी एका विशिष्ट स्थळाशी निगडित घटना इतक्या चर्चिल्या जातात, की त्या घटना खरोखरच घडत असतील असे वाटू लागते. जसजश्या ह्या कथा कहाण्या पिढी-दर पिढी सांगितल्या जातात, किंवा ऐकल्या जातात, तसतसे ह्या कहाण्यांचे मूळ रूपही बदलत जाते. प्रत्येक सांगणारा त्यामध्ये आपल्या कल्पनाशक्तीचा वापर करून त्यामध्ये आणखी थरार, रोचकता आणण्याचा प्रयत्न करीत असतो. परिणामी मूळ कथा अनेक वर्षांनंतर, जशी घडली, त्याच्या पेक्षा वेगळीच भासू लागते. अशीच कथा आहे कालका-शिमला रेल्वे मार्गावर असलेल्या एका खास बोगद्याची. ह्या बोगद्याची लांबी
१.१४ किलोमीटर असून, ह्या बोगद्याला बरोग टनेल ह्या नावाने ओळखले जाते.

‘क्वीन ऑफ हिल्स’ नावाने ओळखले जाणारे सिमला शहर ब्रिटिशांनी १८१६ सालाच्या अँग्लो-गुरखा युद्धानंतर वसविले. १८३० सालापर्यंत हे ठिकाण ब्रिटीश राजवटी साठी महत्वाचे ठिकाण बनले आणि त्यानंतर १८६४ सालापासून ह्या शहराची ओळख ब्रिटीशांची ‘उन्हाळी राजधानी’, म्हणजेच ‘समर कॅपिटल’ म्हणून झाली. ह्या ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी, सामानाची ने-आण करण्यासाठी कालका पासून सिमला पर्यंत नॅरो गेज रल्वे लाईन तयार करण्याचा निर्णय १८९८ साली घेण्यात आला. त्याचे काम १९०० साली सुरु झाले, आणि अवघ्या तीन वर्षांच्या काळामध्ये हे काम पूर्ण झाले. १९०३ साली, ९ नोव्हेंबर रोजी लॉर्ड कर्झन ह्यांच्या हस्ते ह्या रेल्वे मार्गाचे उद्घाटन झाले. आता, शंभर वर्षांच्या काळानंतर, म्हणजे २००७ साली ह्या रेल्वे मार्गाला ‘ हेरीटेज प्रॉपर्टी ‘ म्हणून घोषित करण्यात आले. २००८ साली ह्या रेल्वे मार्गाला युनेस्को तर्फे वर्ल्ड हेरीटेज साईट म्हणून घोषित करण्यात आले.

कालका ते सिमला दरम्यानचा हा १०० किलोमीटरचा प्रवास बहुतांशी डोंगरातूनच आहे. ह्या मार्गावर २० स्टेशन्स असून, १०७ बोगदे बनविण्यात आले होते. पण आता ह्यांपैकी दोन स्टेशन्स कमी करण्यात आली असून, ५ बोगदे मार्गातून काढून टाकण्यात आले आहेत. उरलेल्या बोगाद्यांपैकी एक आहे बरोग टनेल. बरोग हे लहानसे गाव कालका पासून ४३ किलोमीटरच्या अंतरावर आहे. ह्या बोगद्याचे आणि गावाचे नाव ‘बरोग’ नामक ब्रिटीश इंजिनियरच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. ह्या रेल्वे मार्गाच्या निर्मितीमध्ये बरोग ह्यांचा महत्वाचा सहभाग होता. येथील ‘टनेल नंबर ३३’ च्या निर्माण कार्याची जबाबदारी बरोग ह्यांची होती. त्याकाळी अद्ययावत यंत्रणेच्या अभावी, निर्माणकार्य हे इंजिनियर्सच्या अनुभवांवर, अंदाजांवर आणि निर्णयांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असे. बोगदा बनवायच्या उद्देशाने बरोग यांनी डोंगराच्या दोन्ही बाजूंनी खोदकाम करविण्यास सुरुवात केली. त्यामागे विचार हा, की दोन्ही बाजूंनी खोदकाम करीत डोंगराच्या मध्य भागापर्यंत यायचे आणि बोगदा पूर्ण करायचा.

पण झाले मात्र भलतेच. दोन्ही बाजूंनी खोदकाम करताना मध्यभागी दोन्ही बोगदे एकत्र मिळण्याची योजना फिसकटली. झाले असे, की खोदकाम करताना दोन्ही बाजूंनी दिशा चुकल्याने दोन्ही बाजूचे बोगदे मध्ये मिळून एकच मोठा बोगदा तयार होण्याऐवजी, दोन वेगळे बोगदे तयार झाले. ह्या गोंधळामुळे बरोगना ब्रिटीश सरकारची नाराजी पत्करावी लागली, आणि त्यांना कामावरून बडतर्फ केले गेले. तसेच ह्या चुकीसाठी शिक्षा म्हणून बरोगना एक रुपया दंड म्हणून भरावा लागला. घडल्या प्रकारामुळे बरोगची खूप नाचक्की झाली. लोकांनी त्यांची खिल्ली उडविण्यास सुरुवात केली. हे अपमान सहन न होऊन अखेरीस बरोग ह्यांनी ह्याच बोगद्यात स्वतःवर गोळी झाडून घेऊन आत्महत्या केली.

त्यानंतर बरोग ह्यांना त्या बोगाद्याजवळच दफन करण्यात आले, आणि त्या बोगद्याला आणि गावाला बरोगचे नावही देण्यात आले. नंतर हॅरीन्गटन नामक इंजिनियरच्या देखरेखीखाली नवीन बोगदा तयार करण्यात आला. ह्याच बोगद्याला आजच्या काळामध्ये टनेल नंबर ३३ असे म्हटले जाते. ह्या सर्व घटनेने एका नवीन कथेला जन्म दिला. असे म्हणतात, की बरोगचा आत्मा आजही ह्या बोगद्यामध्ये वावरत असतो. पण हे भूत कोणालाही इजा पोहोचावीत नाही. मात्र अधून मधून ह्या बोगद्यातून जाणाऱ्या लोकांशी गप्पा मारणे मात्र ह्या भुताला आवडते. तसा अनुभवही आल्याचे अनेक जण सांगतात. जर ह्या बोगद्यात शिरून बरोगचे नाव घेऊन मोठ्याने हाक मारली, तर त्या हाकेला प्रत्युत्तरही येते असे ही येथील स्थानिक रहिवासी म्हणतात. बरोगच्या भुताची कहाणी कितपत खरी आहे कोण जाणे, पण कहाणी आहे मोठी रोचक, ह्यात शंका नाही.

Leave a Comment