आता डोळ्यांच्या आतही दागिने घालण्याची फॅशन


विज्ञानाने आजच्या काळामध्ये केलेल्या प्रगतीची उदाहरणे आपण जागोजागी पाहताच आहोत. किंबहुना आजच्या काळातील आपले आयुष्य विज्ञानाने केलेल्या प्रगतीवर मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. विज्ञानामध्ये प्रगती अनेक अंगांनी झाली. तंत्रज्ञान, औद्योगीकरण, वैद्यकीय क्षेत्रातही मोठी प्रगती झाली. त्याचबरोबर प्रगती झाली कॉस्मेटिक सर्जरीच्या जगतात. ह्या शास्त्राच्या मदतीने अनेकांनी आपले चेहरे-मोहरे, ओळखू येणार नाहीत इतके बदलून घेतले, शरीराची ठेवण बदलून घेतली, कोणी दात सोन्याचे करविले, तर कोणी दातांवर हिरे जडवून घेतले. आता या पुढे ही जाऊन एका कॉस्मेटोलॉजिस्ट ने एक नवीन कारनामा केला आहे. ह्या डॉक्टरने डोळ्यांच्या आतमध्ये देखील दागिने जडविण्याची नवीन फॅशन अस्तित्वात आणली आहे.

डोळ्यांमध्ये धुळीचा सूक्ष्म कण शिरला, तरी आपल्या डोळ्यांची आग होऊ लागते, डोळ्यांतून पाणी येऊ लागते. तिथेच आता उत्साही मंडळी आपल्या डोळ्यांच्या आत दागिना घालून घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. ही फॅशन अमेरिकेतील न्यू यॉर्क शहरामध्ये सुरु झाली आहे. इथे एका महिला कॉस्मेटोलॉजिस्टने तिच्या एका पेशंटच्या डोळ्याचे ऑपरेशन करून डोळ्यामध्ये चक्क एक लहानसा दागिना लावून दिला. हे ऑपरेशन सफलही झाले, आणि ‘सुपरहिट’ ही. न्यू यॉर्कमधील पार्क अॅव्हेन्यू लेसर सर्जरी क्लिनिकमध्ये हे ऑपरेशन करण्यात आले आहे. ह्या ऑपरेशन द्वारे महिला पेशंट च्या डोळ्यामध्ये तिचा आवडता प्लॅटीनम धातूचा दागिना घालण्यात आला आहे.

हा दागिना हृदयाच्या आकाराचा असून, ह्याचा साईझ ३/४ मिलीमीटर आहे. ह्या अजब ऑपरेशनचे व्हिडियो शुटींग देखील करण्यात आले आहे. ऑपरेशन करण्यापूर्वी पेशंटच्या डोळ्याचा भाग भूल देऊन बधीर करण्यात आला, आणि त्यानंतर हा लहानसा दागिना पेशंटच्या डोळ्यामध्ये घालण्यात आला. ह्या दागिन्याला पॉलिश देखील करण्यात आले. ह्या सर्व ऑपरेशसाठी केवळ पाच ते सहा मिनिटांचा अवधी लागला. ह्या ऑपरेशनच्या दरम्यान पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही. ‘डेली मेल’ ने दिलेल्या वृत्तानुसार, हे ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरने, डोळ्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही अशी खात्री दिली आहे. ह्या ऑपरेशनच्या माध्यमातून पेशंटला हवे त्या आकाराचे दागिने डोळ्यांमध्ये घातले जाऊ शकत असल्याचे समजते. असे ऑपरेशन न्यू यॉर्कमध्ये तीन लोकांनी करवून घेतले असून, आता ही संख्या झपाट्याने वाढणार असल्याचे चिन्ह आहे.

Leave a Comment