रावण संहितेमध्ये आहेत जीवन सफल करण्याचे कानमंत्र


सीतेचे हरण करून रामाशी युद्ध करणारा रावण आपण दुष्ट प्रवृत्तीचा समजत असलो, तरी धर्मशास्त्रांमध्ये रावणाचा उल्लेख आदर्श राज्यकर्ता, प्रकांड पंडित आणि अनेक शास्त्रांचा, विद्यांचा जाणकार म्हणून केला गेला आहे. ‘विनाशकाले विपरीत बुद्धी’ होऊन रावणाने सीतेचे अपहरण करून स्वतःचा अंत ओढवून घेतला हे जरी खरे असले. तरी राज्यकर्ता म्हणून रावण अतिशय निपुण समजला जातो. त्याच्या राज्यामध्ये रयत आनंदी, समाधानी होती, सगळीकडे भरभराट होती, सुबत्ता होती. म्हणूनच लंका सोन्याची असल्याचा उल्लेख अनेक कथांमध्ये सापडतो. रावण ज्योतिष विज्ञानामध्ये पारंगत होता. त्याने ज्योतिष आणि तंत्रविद्यांसंबंधी इतरांना ज्ञान व्हावे म्हणून रावणसंहितेची रचना केली. ह्याच रावण संहितेमध्ये जीवनामध्ये सफलता प्राप्त करण्याचे कानमंत्र रावणाने दिले आहेत.

ज्या व्यक्तीला केवळ स्वतःची स्तुती ऐकण्याची इच्छा किंवा सवय असते, किंवा जे लोक स्वतःचेच कौतुक करीत रहातात, त्यांना जीवनामध्ये सफलता मिळत नाही असे संहिता म्हणते. आयुष्यामध्ये मनुष्याने नम्र असले पाहिजे, कोणतेही कार्य करताना किंवा निर्णय घेताना त्याचा इतरांवर होणारा परिणाम लक्षात घेतला पाहिजे असे संहिता म्हणते. कोणत्याही परिस्थीतीमध्ये आपल्या गुरूची साथ सोडणारी व्यक्ती ही आयुष्यामध्ये असफल होते असे संहिता सांगते. तसेच त्या व्यक्तीचे आयुष्य कधीही सुखाचे, समाधानाचे जात नाही असा उल्लेखही संहितेमध्ये आहे.

इतरांची भरभराट किंवा इतरांची संपत्ती पाहून ज्या व्यक्तीला मनामध्ये हेवा निर्माण होतो अशी व्यक्ती आयुष्यामध्ये असफल ठरते. तसेच त्या व्यक्तीला स्वतःच्या आयुष्यामध्ये अनेक संकटांचा सामना करावा लागत असल्याचे संहिता म्हणते. तसेच स्वतःला सतत मिळत असलेल्या यशावर गर्व करणे योग्य नसून, मनुष्याने सर्व यश स्वतःमुळेच मिळते आहे असे गृहीत न धरता, आपल्या यशासाठी परमेश्वराचे आभार मानायला हवेत असे संहिता सांगते.

रावणाने हनुमानाला तुच्छ वानर समजण्याची चुक केली आणि परिणामी सर्व लंका भस्मसात झाली. त्यामुळे कोणत्याही माणसाला स्वतःपेक्षा कमी लेखण्याची चूक करू नये. ह्या कानमंत्राचा रावणाला विसर पडला आणि त्यामुळेच त्याचा विनाश ओढविला. आपल्या पूर्वजांचे स्मरण सतत रहावे, आणि त्यांच्या प्रती मनामध्ये सदैव आदराची भावना असावी असे संहिता सांगते. पूर्वजांच्या पुण्याईने आयुष्यातील मोठमोठ्या संकटांवर मात करण्याचे बळ मिळते. अशी व्यक्ती जीवनामध्ये कधीही असफल होत नाही.

मनुष्याची पत्नी ही त्याची अर्धांगिनी असून त्याच्या सुख दुःखात त्याची सदैव साथ देणारी असते. त्यामुळे आपल्या पत्नीशी गैरवर्तन करणारा, तिला उद्देशून अपशब्द उच्चारणारा मनुष्य आयुष्यामध्ये सफल होऊ शकत नाही असा ही कानमंत्र रावणसंहिता देते.

Leave a Comment