नव्या खराब नोटा बदलून मिळणार नाहीत; आरबीआयचे सरकारला पत्र


मुंबई – चलनात आलेल्या २ हजार व २०० रुपये मूल्याच्या नव्या नोटा खराब झाल्या किंवा फाटल्यास त्या बँकेत भरता येणार नाही किंवा बदलूनही मिळणार नाहीत. कारण या नवीन नोटांचा समावेश चलनी नोटा बदलून देण्यासंदर्भातील नियमांमध्ये झालेला नाही. फाटलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या ‘नोट रिफंड’मधील नियमांतर्गत बदलून देण्यात येतात.

आरबीआय अधिनियमाच्या कलम २८ मध्ये तशी तरतूद आहे. परंतु या नव्या नोटांचा त्यात समावेश झाला नसल्याचे सांगण्यात येते. सध्या व्यवहारात चालणाऱ्या ५, १०, २०, ५०, १००, ५०० या चलनी नोटांचा ‘नोट रिफंड’ नियमात समावेश आहे. नोटबंदीची ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घोषणा झाल्यानंतर दोन हजार मूल्याची नोट काही दिवसांतच चलनात आली. त्यानंतर ऑगस्ट २०१७ मध्ये २०० रुपयांची नोट आली. सध्या दोन हजार रुपयांच्या जवळपास ६.७० लाख कोटी रुपये मूल्य असलेल्या नोटा चलनात आहेत आणि आता त्यांची छपाई बंद करण्यात आली आहे. नव्या सिरीजमधील फाटलेल्या अथवा खराब झालेल्या नोटांच्या तक्रारी सध्या तरी नाहीत. पण आरबीआयने या कायद्यातील तरतुदीत बदल न केल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात, असा इशारा बँक अधिकाऱ्यांनी दिला आहे.

नोट ही हाताळण्यासाठीच असते. त्यात फाटणे, झीज होणे या गोष्टी स्वाभाविक असल्यामुळे नोट रिफंड तरतुदीमध्ये नव्या नोटांचा समावेश करावा, अशा आशयाचे पत्र केंद्र अर्थ मंत्रालयाला २०१७ मध्येच पाठवले. पण सरकारकडून यासंदर्भात आरबीआयला अद्याप कोणतेही उत्तर देण्यात आले नाही.

Leave a Comment