ह्या भारतीय महिलेला ब्रिटीश शाही विवाहसमारंभासाठी खास आमंत्रण


ब्रिटीश शाही परिवारासाठी हा अतिशय महत्वाचा समारंभ आहे. शनिवारी १९ मे रोजी शाही घराण्याचे राजकुमार प्रिन्स हॅरी आणि अमेरिकन अभिनेत्री मेघन मार्कल विवाहबद्ध होणार आहेत. ह्या शाही विवाह सोहोळ्यानिमित्त देशभ-विदेशातील अनेक नामवंत व्यक्तींना खुद्द राणी एलिझाबेथ तर्फे आमंत्रणे पाठविली गेली आहेत. ह्या विवाह सोहोळ्यासाठी मूळच्या भारतीय असलेल्या ह्या महिलेलाही आग्रहाचे आमंत्रण आहे. ह्या विवाह सोहोळ्यासाठी देश-विदेशातून सुमारे बाराशे पाहुणे मंडळी हजेरी लावणार आहेत.

ह्या विवाहसमारंभासाठी खास आमंत्रित असलेली, मूळची भारतीय असलेली रोजी गिंडे पंजाबी परिवारातील असून, बिस्किट्स बनविणाऱ्या अतिशय प्रसिद्ध असलेल्या ‘मिस मॅकरून’ ह्या कंपनीची संस्थापक आहे. ह्या कंपनीचे वैशिष्ट्य हे, की ह्या कंपनीला होणाऱ्या आर्थिक नफ्याचा काही भाग युवा पिढीला रोजगार मिळवून देण्यासाठी, किंवा त्यांना तसे खास प्रशिक्षण मिळवून देण्यासाठी खर्च केला जातो. ह्या विवाह समारंभासाठी रोजीला आमंत्रण पाठविले जाण्यामागे खास कारण असल्याचे समजते.

गेल्या महिन्यामध्ये बर्मिंगहॅम या ठिकाणी आयोजित कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या शाही परिवारातील सदस्यांनी ‘मिस मॅकरून’ च्या बिस्किटांचा आस्वाद घेतला होता. सर्व मंडळींना ही बिस्किटे अतिशय आवडली. ही बिस्किटे नेमकी कुठून आणविली गेली ह्याची चौकशी केली असता शाही परिवारातील सदस्यांना रोजी च्या कंपनीबद्दल सविस्तर माहिती समजली, तसेच ती करीत असलेल्या समाजकल्याण कार्याबद्दल समजल्यानंतर त्या सर्वांना तिचे मनापासून कौतुकही वाटले. रोजीच्या कंपनीने तयार केलेली बिस्किटे सर्वांना इतकी आवडली, की इथून पुढे सर्व शाही कार्यक्रमांमध्ये ही बिस्किटे आवर्जून मागाविण्याचा निर्णय त्यांनी घेतला.

रोजीने देखील ह्या गोष्टीला अर्थातच आनंदाने स्वीकृती दिली. रोजीने युनिव्हीर्सिटी कॉलेज ऑफ बर्मिंगहॅम येथून ‘शेफ’ होण्यासाठी प्रशिक्षण घेतले असून, त्यानंतर तिने स्वतंत्रपणे व्यवसायास सुरुवात करीत ‘मिस मॅकरून’ कंपनीची स्थापना केली. ब्रिटन मध्ये आपली कंपनी यशस्वी करीत, आणि त्याचबरोबर समाजकल्याण कार्यांमध्येही अग्रणी असलेल्या रोजीला आजवर अनेक पुरस्कारांनी सम्मानित केले गेले आहे. आणि आता शाही परिवारातील विवाहसोहोळ्याचे आमंत्रण आल्यामुळे रोजीला आनंदाने आभाळ ठेंगणे झाले आहे.

Leave a Comment