मुंबईकडून पराभव होताच ट्रेंडमध्ये आला युवराज


मुंबई – मुंबई इंडियन्सने किंग्ज इलेव्हन पंजाबचा अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या लढतीत अवघ्या ३ धावांनी पराभव केला. किंग्ज इलेव्हन पंजाब अ‍ॅण्डय़्रू टायच्या भेदक माऱ्यानंतर लोकेश राहुल आणि आरोन फिंच यांच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर विजय मिळवेल असे चित्र होते. पण राहुल १९व्या षटकात बाद होऊन माघारी परतला आणि मुंबईचा विजय निश्चीत झाला.

दुसरीकडे, पंजाबच्या अडचणी प्लेऑफसाठी महत्त्वाच्या असलेल्या या सामन्यात पराभव झाल्याने प्रचंड वाढल्या आहेत. धडाकेबाज खेळाडू युवराज सिंग आणि कर्णधार रविचंद्रन अश्विनच्या नेतृत्वाला पंजाबच्या पराभवासाठी चाहत्यांनी जबाबदार धरले आहे. जेव्हा युवराज खेळपट्टीवर आला तेव्हा पंजाबला विजयासाठी ९ चेंडूंमध्ये २० धावांची आवश्यकता होती. केवळ तीनच चेंडू युवराज खेळला आणि त्यामध्ये केवळ १ धाव तो करु शकला. परिणामी पंजाबला पराभाचा सामना करावा लागला.

पंजाबचे चाहते पंजाबचा पराभव होताच युवराज सिंगवर चांगलेच संतापले. युवराजवर सोशल मीडियामध्ये चाहत्यांनी राग व्यक्त केला. त्याला अनेकांनी निवृत्ती घेण्याचा सल्ला दिला. युवराजच्या काही चाहत्यांनी त्याचा बचाव करताना अश्विनला पराभवासाठी जबाबदार धरले. अक्षर पटेलला कर्णधार अश्विनने युवीच्या आधी फलंदाजीला पाठवण्याच्या निर्णयावर चाहत्यांनी तोंडसूख घेतले. युवराज सिंग बराच वेळ ट्विटरवर ट्रेंड होत होता.