सुंदर पिचाईच्या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांचा गुगलला रामराम


गुगल कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे गुगलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी नोकरीला रामराम केला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण खात्याच्या मेव्हेन नावाच्या प्रकल्पात सामील होण्याचा निर्णय पिचाई यांनी घेतला आहे. याच्या निषेधार्थ या कर्मचाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असल्याचे मानले जात आहे. या प्रकल्पावर गुगलच्या क्‍लाऊड यूनिटने स्वाक्षरी केली होती आणि त्यातून अब्जावधी डॉलरचा महसूल मिळेल, अशी अपेक्षा आहे.

सुंदर पिचाई हे कंपनीच्या दृष्टीने एक वादग्रस्त प्रकल्प घेऊन येत आहेत, अशा याचिकेवर गेल्या एप्रिल महिन्यात सुमारे 4 हजार कर्मचाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या. त्यानंतर या महिन्यात सुमारे एक डझन कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे, असे गिज्मोडो या संकेतस्थळाने म्हटले आहे.

कंपनीने मेव्हेन प्रकल्पात सामील होऊ नये, अशी या कर्मचाऱ्यांची इच्छा आहे. संरक्षण खात्याच्या ड्रोन वॉरफेयर योजनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञान पुरविण्यासही या कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. हा ड्रोन माणसे आणि वस्तू यांतील अंतर समजणार आहे. अशा प्रकारच्या लष्करी योजनेत गुगलने सामील होऊ नये कारण त्यामुळे वापरकर्त्याच्या विश्वासाला तडा जाईल, असेही या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Leave a Comment