उच्च रक्तदाब रोखू या


आज सार्‍या जगातच उच्च रक्तदाब दिन पाळला जात आहे. असा दिवस पाळण्याची वेळ का येते ? त्या त्या विकाराचे प्रमाण गंभीर एवढे वाढते आणि ते कमी करण्याबाबत जनतेला शहाणे करण्याची गरज वाटायला लागते तेव्हा त्यासाठी असा एक दिवस पाळला जात असतो. २००५ साली जगात आणि त्यातल्या त्यात भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढत चालल्याचे आढळून आले आणि जागतिक आरोग्य संघटनेने १७ मे या दिवशी या विषयावर जनजागृती करण्याचे ठरवले. भारतात उच्च रक्तदाबाचे प्रमाण भयावह एवढे वाढले आहे. केन्द्र सरकारच्या आरोग्य खात्याने याबाबत एक पाहणी केली. देशातल्या १०० जिल्ह्यात दोन कोटी २५ लाख लोकांची या दृष्टीने तपासणी केली तेव्हा दर आठ जणामागे एक जण उच्च रक्तदाबाचा रुग्ण असल्याचे दिसून आले.

ही पाहणी २०१७ साली म्हणजेच नुकतीच करण्यात आली आहे. त्याआधी २०१३ ते २०१८ या कालावधीत जागतिक आरोग्य संघटनेने लोकांना याबाबत सावध केले होते आणि सर्वांनी आपल्या रक्तदाबाच्या तपासण्या वेळोवेळी कराव्यात याबाबत प्रबोधन केले होते. रक्तदाबाची वेळीच तपासणी केली तर पुढील अनेक अनर्थ टळतात. कारण तो तसाच राहिला तर अवयव निकामी होणे आणि हृदय विकाराचा झटका येणे असे परिणाम संभवतात. तेव्हा कोणाला श्‍वास घ्यायला त्रास व्हायला लागला, छाती दुखायला लागली, डोके तीव्रपणे दुखायला लागले, झटके यायला लागले की उच्च रक्तदाबाची तपासणी करून घ्यावी. उच्च रक्तदाब हा राहणीमानातून निर्माण होणारा विकार आहे. तेव्हा बैठी कामे करणारे, दारू पिणारे आणि सातत्याने वेदनाशामक गोळ्या घेणारे यांना तो जडण्याची शक्यता असते.

यापासून सुटका करून घेण्यासाठी काही सोपी पथ्ये आहेत. त्यातले सर्वात मोठे पथ्य म्हणजे मीठ कमी खाणे. दररोज किमान १० हजार पावले चालणे. मनाचा क्षोभ होईल असे प्रसंग टाळणे. दारू़ आणि सिगारेट या व्यसनापासून दूर राहणे. ज्यांना किडनीचा विकार असतो त्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याची शक्यता जास्त असते. तसेच उच्च रक्तदाब हा आनुवंशिकही असतो. म्हणजे ज्याच्या आईवडलांना हा विकार असतो त्यांना तो जडण्याची शक्यता जास्त असते. म्हणून उच्च रक्तदाब असणार्‍या मातापित्यांच्या मुलांनी आणि मुलींनी रक्तदाबाबाबत अधिक काळजी घेण्याची आवश्यकता असते. विशेषत: त्यांनी आपले वजन नियंत्रणात ठेवले पाहिजे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment