आरोग्य मिळावा, ते ही तुमच्या बजेटमध्ये


आजचा जमाना फिटनेसचा आहे. निरोगी राहणे हा पर्याय आयुष्याभरासाठीचा असतो. एकदा हा पर्याय निवडला, की त्या दृष्टीने सुरु केलेली वाटचाल ही आयुष्यभर चालू ठेवायची असते. फिट राहण्यासाठी ज्याप्रमाणे वेळ देण्याची आवश्यकता असते, त्याप्रमाणे त्यासाठी खूप पैसे देखील खर्च करावे लागतात अशी सर्वसाधारण समजूत असल्याचे दिसून येते. महागड्या जिम्सच्या मेंबरशिप, महागडी डायट फुड्स, हेल्थ सप्लीमेंटस् ह्यावाचून फिट राहणे शक्य नाही अशी समजूत जर कोणाची असेल, तर ती नक्कीच चुकीची आहे. फिट राहण्याकरिता तुम्हाला फार जास्त पैसे खर्च करण्याची अजिबात आवश्यकता नाही. त्यासाठी काही टिप्सचा अवलंब तुम्ही करू शकता.

आजकाल अनेक शहरांमध्ये निरनिराळे फिटनेस ग्रुप्स कार्यरत आहेत. ह्यातील सभासद त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार एकत्र येऊन निरनिराळे वर्क आउट करीत असतात. पैसे कमविण्याच्या उद्देशाने हे ग्रुप्स तयार झाले नसून, ज्यांना व्यायामाची खरोखर आवड आहे, अश्या लोकांनी एकत्र येऊन, एकमेकांकडून काही तरी नवीन शिकायला मिळेल, एकमेकांकडून प्रेरणा घेता येईल ह्या उद्देशाने हे ग्रुप्स तयार झालेले असतात. त्यामुळे अश्या ग्रुप्सचे सभासद होऊन तुम्हाला तुमचा फिटनेसचा प्रवास सुरु करता येईल. अश्या ग्रुप्स बद्दलची अधिक माहिती सोशल मिडीयाच्या माध्यमातून सहज उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे आपण राहतो त्या भागामध्ये असे फिटनेस ग्रुप्स आहेत का याबद्दल माहिती मिळविणे सहज शक्य आहे.

आजकाल टीव्ही आणि मोबाईलफोन्सच्या, इंटरनेटच्या माध्यमातून अनेक फिटनेस अॅप्स उपलब्ध आहेत. ह्याकरिता महिन्याकाठी अगदी थोडेसे पैसे खर्च करावे लागतात. अनेक एक्स्पर्ट्ससोबत तुम्ही ह्या चॅनल्सच्या माध्यमातून वर्क आउट घरच्या घरी करू शकता. यू ट्यूब वरही असे अनेक वर्कआउट व्हिडीयोज मोफत उपलब्ध आहेत. ही अॅप्स फॉलो करण्यापूर्वी त्यांचे रेटिंग तसेच रिव्ह्यू पाहून घ्यावेत, व ज्या वर्कआउटचे किंवा अॅप चे रेटिंग आणि रिव्ह्यू सर्वात चांगले असतील, ते फॉलो करावे.

फिटनेसच्या नाण्याची एक बाजू म्हणजे व्यायाम, आणि दुसरी बाजू म्हणजे अर्थातच आहार. फिट राहण्यासाठी आजकाल नित्य नवीन डायट सुचविली जात असतात. पण प्रसिद्ध न्यूट्रीशनिस्ट ऋजुता दिवेकर म्हणतात, की डायटच्या नावाखाली नव-नवीन, पूर्वी कधीही न ऐकलेल्या पदार्थांचा समावेश आपल्या आहारात न करता आपण जेथे राहतो तिथे जो काही आहार प्रचलित असेल, तोच आहार आपल्या शरीरासाठी उत्तम असतो. त्यामुळे इम्पोर्टेड पदार्थांवर भरमसाट पैसे खर्च न करता, आपला रोजचा आहार, आपल्या स्थानिक भाज्या, फळे, कडधान्ये आपल्यासाठी उत्तम असून, परिपूर्ण आहार आहेत हे लक्षात घेणे आवश्यक आहे.

साप्ताहिक सुट्टीच्या दिवशी हमखास बाहेर जाणे होतेच. जे लोक एकटेच राहतात, त्यांना तर दररोज बाहेरचेच खाण्यावाचून पर्यायच नसतो. त्यावेळी भरपूर पैसे तर खर्च होतातच, शिवाय खाण्यावरही फारसे नियंत्रण राहत नाही. अश्या वेळी बाहेर जाण्यापेक्षा, किंवा बाहेरून काही मागविण्यापेक्षा घरातच काही तरी पौष्टिक बनविता येईल का हे पाहावे. सॅलडस् , मोडविलेली कडधान्ये, घरीच ग्रील किंवा बेक केलेले पदार्थ, हा बाहेरील तेलकट, मसालेदार जेवणाला चांगला पर्याय आहे. मेजवानीच्या निमित्ताने बाहेर जाण्याची वेळ आलीच, तर घराबाहेर पडण्यापूर्वी सॅलड, किंवा तत्सम पौष्टिक नाश्ता करूनच बाहेर पडावे. त्यामुळे पोट भरलेले राहील आणि बाहेरचे तेलकट, मसालेदार पदार्थ फारसे खाल्ले जाणार नाहीत.

मेजवानीच्या निमिताने मद्यपानाचा कार्यक्रम असेल, तर मद्य आवर्जून टाळावे. आरोग्याच्या आणि खिश्याच्या दृष्टीनेही मद्यपान अपायकारक ठरू शकते. अल्कोहोलिक ड्रिंक्समध्ये कॅलरीज भरपूर असून, त्या कॅलरीज खर्च कशा होणार ह्याची चिंता करीत बसण्यापेक्षा मुळातच मद्यपान टाळले, किंवा अतिशय कमी प्रमाणात केले, तर हा प्रश्नच उद्भविणार नाही. त्यामुळे मेजवानीला गेल्यानंतर मद्याच्या ऐवजी नारळ पाणी, लिंबाचे सरबत, किंवा साधे पाणी हे सर्वोत्तम पर्याय असू शकतात.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment