इजिप्शियन ज्योतिषशास्त्राप्रमाणे जाणून घ्या आपली स्वभाव वैशिष्ट्ये


भारतीय ज्योतिषशास्त्राप्रमाणे इजिप्शियन ज्योतिषशास्त्रामध्यदेखील बारा राशी सांगितलेल्या आहेत. पण चंद्रराशी जशा दर महिन्याप्रमाणे बदलतात, तसे इजिप्शियन राशींमध्ये काही महिन्यांचे काही ठराविक दिवस समाविष्ट केले जातात. हे दिवस एकाच महिन्यातील नसून वेगवेगळ्या महिन्यांतील आहेत. इजिप्शियन ज्योतिषशास्त्रातील प्रत्येक राशीचे स्वामी इजिप्शियन देव-देवता आहेत. ज्या ज्योतिषशास्त्राप्रमाणे प्रत्येक राशीचे स्वभाव वैशिष्ट्य जाणून घेऊ या.

जानेवारी १-७, जून १९-२८, नोव्हेंबर १८-२६ ह्या दिवसांमध्ये जन्म झालेल्या व्यक्ती ‘नाईल’ राशीच्या आहेत. ह्या व्यक्ती अतिशय भावूक स्वभावाच्या असून, त्यांना सतत नवीन काही तरी करून पाहण्याची उत्सुकता असते. इतरांशी कोणत्याही कारणांवरून होणारे मतभेद टाळण्याकडे ह्यांचा कल असतो. ह्या व्यक्ती अतिशय शांतताप्रिय असून, ह्यांची निरीक्षणशक्ती उत्तम असते. ह्यांना इतरांशी उत्तम संवाद साधता येतो. क्वचित हे लोक भावनेच्या भरात नको ते निर्णय घेतात, आणि त्याचा त्यांना पश्चात्ताप होण्याची शक्यता असते. जानेवारी ८-२१, फ्रेब्रुवारी १-११ ह्या दिवसांच्या मध्ये जन्मलेल्या व्यक्तींची रास ‘ अमोन रा’ आहे. या व्यक्ती अतिशय संतुलित स्वभावाच्या असून ह्यांचा आत्मविश्वास जबरदस्त असतो. ह्या व्यक्ती उत्तम नेता असतात. ह्या गोष्टी भविष्याची फारशी चिंता न करणाऱ्या, जे समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करणाऱ्या असतात. ह्या व्यक्ती जात्याच हुशार असून, अतिशय सकारात्मक दृष्टीकोन असणाऱ्या असतात.

‘मूट’ राशीच्या व्यक्ती जानेवारी २२-३१, सप्टेंबर ८-२२ ह्या दिवसांमध्ये जन्मलेल्या असतात. ‘मूट’ ह्या शब्दाचा अर्थ ‘आई’ असा आहे. ह्या व्यक्ती उत्तम पालक असतात. आपल्या परिवारजनांचे कल्याण आणि त्यांचे संरक्षण करण्यासाठी ह्या व्यक्ती काहीही करू शकतात. ह्या व्यक्तींचा स्वभाव अतिशय मृदू, दयाळू असतो. ह्या व्यक्ती काहीश्या लाजऱ्या स्वभावाच्या असतात. त्यामुळे आपले मन ह्या व्यक्ती सहसा पटकन मोकळे करू शकत नाहीत. ‘जेब’ राशीच्या व्यक्तींचा जन्म फेब्रुवारी १२-२९, ऑगस्ट २०-३१ ह्या काळामध्ये झालेला असतो. ह्या व्यक्ती अतिशय दयाळू आणि भावनाप्रधान असतात. त्यांच्या बाजूला घडत असलेल्या लहान मोठ्या गोष्टींचा ह्यांच्या मनावर खोल परिणाम होत असतो. ह्या व्यक्ती इतरांच्या भावनांचा खूप विचार करतात. तसेच इतरांच्या बाबतीत ह्यांच्या मनामध्ये सहानुभूतीची भावना असते. त्यामुळे अनेक जण ह्या व्यक्तींच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात.

‘ओसायरीस’ राशीच्या व्यक्तींचा जन्म १-१० मार्च, २७ नोव्हेंबर ते १८ डिसेम्बर ह्या काळामध्ये झालेला असतो. ह्या व्यक्ती दुहेरी व्यक्तिमत्वे असलेल्या असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाची एक बाजू खूप कणखर असते, तर दुसरी बाजू भावनाप्रधान असते. ह्या व्यक्तींचा आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन नेहमी सकारात्मक असतो. ह्यांना आयुष्यामध्ये नेहमी काही तरी नवीन, थरारक करून पहायचे असते. अश्या स्वभावामुळे ह्या व्यक्ती कधी कधी फाजील आत्मविश्वास बाळगून असतात. ‘आईसीस’ राशीच्या व्यक्ती १११-३१ मार्च, १८-२९ ऑक्टोबर, १९-३१ डिसेंबरह्या काळामध्ये जन्मलेल्या असतात. ह्या व्यक्ती अतिशय स्पष्टवक्त्या असून, त्यांना सरळ बोलणे आवडते. बोलताना अजिबात आडून आडून न बोलता ह्या व्यक्ती थेट मुद्द्यावर येतात. ह्या व्यक्ती स्पष्टवक्त्या असल्याने त्या उद्धट आहेत असा काहींचा गैरसमज होण्याची शक्यता असते. पण ह्या व्यक्ती अतिशय मनमिळावू स्वभावाच्या आणि प्रेमळ असतात.

‘ठॉथ’ राशीच्या व्यक्ती १-१९ एप्रिल, ८-१७ नोव्हेंबर ह्या काळामध्ये जन्मलेल्या असतात. ह्या व्यक्ती अतिशय कल्पक असून, नवनवीन कल्पना ह्यांना सतत सुचत असतात. इतरांच्या अडचणी ऐकून घेण्याचा, त्यांना समजून घेण्याचा त्यांचा स्वभाव असून, त्या अडचणींवर तोडगा काढणे ह्या व्यक्तींना सहज जमते. ह्या व्यक्ती इतरांशी उत्तम संवाद साधू शकतात. ह्या व्यक्ती अतिशय रोमँटिक असून, ह्यांची इतरांशी असलेली नाती दीर्घ काळापर्यंत टिकून राहतात. ह्या व्यक्तींना इतरांमधील अवगुण न पाहता, केवळ गुण पाहण्याची सवय असते. एप्रिल २०- मे ७, ऑगस्ट १२-१९ ह्या काळात जन्मलेल्या व्यक्ती ‘होरस’ राशीच्या असतात. ह्या व्यक्ती धाडसी स्वभावाच्या असतात. ह्या व्यक्ती उत्तम नेता ठरतात. ह्यांना धोका पत्करणे आवडते. ह्यांचे व्यक्तिमत्व अतिशय आकर्षक असून ह्यांचा मित्रपरिवार खूप मोठा असतो.

मे ८-२७, जून २९-जुलै१३ ह्या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती ‘अनुबिस’ राशीच्या आहेत. ह्या व्यक्तींना स्वतःचाच सहवास आवडतो. ह्या व्यक्ती अंतर्मुखी असून अतिशय कल्पक असतात. ह्या व्यक्तींना एकटे राहणे आवडत असून ह्या काहीशा भावनाप्रधान असतात. ह्या व्यक्तींना एकट्याने काम करणे आवडते. मे २८-जून १८, सप्टेंबर २८-ऑक्टोबर २ ह्या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती ‘सेथ’ राशीच्या आहेत. ह्या व्यक्ती स्वतःच्या स्वप्नांच्या विश्वात असतात. ह्या व्यक्तींना वेगवान आयुष्य आवडते. ह्या व्यक्ती आयुष्यामध्ये सतत काही तरी नवे करण्याच्या प्रयत्नात असतात. कोणत्याही प्रकारे अडकून पडणे किंवा कमिटमेंट करणे ह्या व्यक्तींना मानवत नाही.

जुलै १४-२८, सप्टेंबर २३-२७, ऑक्टोबर ३-१७ ह्या काळामध्ये जन्मलेल्या ‘बास्टेट’ राशीच्या आहेत. ह्या व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये संतुलन आणि शांततेच्या शोधात असतात. ह्या व्यक्तींना अनेक घटनांची पूर्वकल्पना असते. इतरांच्या अडचणीच्या काळामध्ये त्यांना मदत करण्यात ह्या व्यक्ती नेहमी पुढे असतात. कोणत्याही प्रकारच्या मतभेदांपासून ह्या व्यक्ती चार हात दूरच असतात. भविष्यात घडणाऱ्या गोष्टींचा ह्यांना अचूक अंदाज असतो. जुलै २९-ऑगस्ट ११, ऑक्टोबर ३०-नोव्हेंबर ७ ह्या काळामध्ये जन्मलेल्या व्यक्ती ‘सेख्मेत’ राशीच्या असतात. ह्या व्यक्ती अतिशय नम्र स्वभावाच्या असतात. ह्यांना ऐषारामी आयुष्य जगणे आवडते, पण हे सत्तेच्या आहारी जाणारे लोक नाहीत. ह्या व्यकी अतिशय शिस्तप्रिय, खंबीर स्वभावाच्या असतात. ह्यांना आयुष्यामध्ये सर्वच गोष्टींचे उत्तम संतुलन साधता येते.

Leave a Comment