विधीमंडळ नेतेपदी येडियुरप्पांची निवड


बंगळूरू – कर्नाटकमध्ये भाजपने सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या असून भाजप आमदारांनी बुधवारी येडियुरप्पा यांची पक्षाच्या विधीमंडळनेतेपदी निवड केली असून येडियुरप्पा यांनी यानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांची भेट घेतली. राज्यपालांना मी पत्र दिले असून योग्य तो निर्णय ते घेतील, अशी आशा येडियुरप्पा यांनी वर्तवली.

कोणत्याही पक्षाला कर्नाटक विधानसभा निवडणुकीत निर्णायक बहुमत मिळालेले नाही. १०४ जागा जिंकून भाजप येथे सर्वात मोठा पक्ष ठरला. तर काँग्रेस ७८ आणि जनता दल सेक्यूलर या पक्षाला ३७ जागांवर विजय मिळाला आहे. या दोन्ही पक्षांनी निवडणुकोत्तर युती करत सत्तास्थापनेचा दावा केला आहे. जनता दल सेक्यूलरचे कुमारस्वामी यांना मुख्यमंत्रीपद देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दुसरीकडे कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार बी. एस. येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाखाली भाजप आमदारांची बैठक बुधवारी सकाळी पार पडली. येडियुरप्पा यांची या बैठकीत विधीमंडळ नेतेपदी निवड करण्यात आल्यानंतर राज्यपाल वजूभाई वाला यांची त्यांनी भेट घेतली. त्यांनी या भेटीत राज्यपालांना सत्तास्थापनेसंदर्भात पत्र दिले. विधीमंडळनेतेपदी पक्षाने माझी निवड केली आहे. राज्यपालांना मी पत्र दिले आहे. ते आता आम्हाला सत्तास्थापनेसाठी संधी देतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. योग्य तो निर्णय राज्यपाल घेतील, असे त्यांनी नमूद केले. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उद्या (गुरुवारी) येडियुरप्पा यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

Web Title: Yeddyurappa elected as Leader of the Legislative Assembly