मातीच्या ढिगाखाली सापडला तीन हजार वर्षे जुना खजिना


ज्या रस्त्यांवरून आपली रोजची ये-जा असेल, त्याच रस्त्याखाली अनकेदा अश्या काही वस्तू सापडतात ज्यांच्या तिथे असण्याची कल्पना देखील कोणी केली नसेल. तसे म्हटले तर ह्या गोष्टींचे शोधही योगायोगानेच लागतात. मग एकदा का त्या वस्तूचा शोध लागला, की ती किती काळपर्यंत तिथे होती, ती तिथे नेमकी आली कशी, ह्याबद्दल शोध सुरु होतात. इजिप्तची राजधानी कैरो येथेही सध्या असेच काहीसे घडले आहे.

कैरोमध्ये मातेरीया नामक वसाहतीमध्ये एक नाला वाहतो. काही महिने अगोदर पुराणकालीन वस्तूंचा शोध घेता घेता जर्मनी आणि इजिप्तमधील पुरातत्ववेत्ते ह्या वसाहतीमध्ये येऊन पोहोचले. त्यांचे शोधकार्य सुऊ असताना प्राचीन संस्कृतीशी निगडीत काही वस्तू त्यांना सापडल्या. ह्या वस्तू सापडल्यानंतर आणखीही अनेक वस्तू सापडण्याची शक्यता लक्षात घेऊन पुरातत्ववेत्त्यांनी आपल्या शोधाचा विस्तार अजून वाढविला. वसाहतीच्या आसपासच्या परिसरामध्ये काहीच न सापडल्याने आपले प्रयत्न वाया गेले असे समजून शोधकर्ता निराश झाले.

पण अचानक त्यांच्या मनामध्ये वेगळाच विचार येऊन त्यांनी वसाहतीतल्या नाल्यामध्ये थोदे खोदकाम करून पाहण्याचे ठरविले. खोदकाम सुरु झाल्यानंतर सुरुवातीच्या काळामध्ये त्यांच्या हाताला काही विशेष लागले नाही. पण खोदकाम शंभर फुट खोलीवर असताना अचानक एक विशालकाय मूर्ती शोधकर्त्यांच्या हाती लागली. ही मूर्ती मातीच्या ढिगाखालून बाहेर काढण्यात आली. त्या मूर्तीचे विश्लेषण केल्यानंतर ती मूर्ती तीन हजार वर्षे जुनी असल्याचे सिद्ध झाले. तीन हजार वर्षांपूर्वी ज्यांचे शासन होते ते राजे दुसरे राम्सेस ह्यांची ती मूर्ती होती. ह्या २६ फुट उंचीच्या मूर्तीचा शोध गेली चार वर्षे सुरु होता.

आजच्या काळामध्ये ही वसाहत जिथे आहे त्या परिसरात एके काळी हिलियोपोलीस नामक शहर वसलेले होते. विश्वाची रचना होत असताना साक्षात सूर्यदेवांनी ह्या शहराची निर्मिती केली असल्याची मान्यता इजिप्त मध्ये रूढ आहे. अनेक शतकांपूर्वी जेव्हा रोमन शासनकर्त्यांनी ह्या शहरावर सत्ता काबीज केली, तेव्हा येथे असणाऱ्या सर्व इमारती पाडून नव्या इमारतींचे निर्माण करण्यात आले. हे निर्माण कार्य चालू असताना राम्सेसची मूर्ती मातीच्या ढिगाच्या खाली दबली असावी असा शोधकर्त्यांचा अंदाज आहे.

ह्या मूर्तीव्यतिरिक्त अनेक मौल्यवान वस्तूंचा खजिना येथे सापडेल असा ह्या शोधकर्त्यांचा अंदाज आहे. त्यामुळे ह्या नाल्यामध्ये आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये शोध मोहीम अजूनही सुरु आहे. ह्या नाल्यामध्ये ज्यांची मूर्ती सापडली ते राजे राम्सेस, त्या काळामधील अतिशय लोकप्रिय शासक होते. त्यांनी ६६ वर्षे राज्य केले. त्यांना त्यांच्या रयतेने राम्सेस द ग्रेट असा खिताब बहाल केला होता. प्राचीन काळी इजिप्तचा विस्तार होण्याचे श्रेय राम्सेस ह्यांना दिले जाते.

Leave a Comment