आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविणारा देवदूत


ऑस्ट्रेलिया देशातील एका शहरामध्ये एक असा वृद्ध इसम आहे, ज्याने आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविले आहेत. डॉक्टर्सदेखील ह्या व्यक्तीला देवदूताची उपमा देतात. ह्या देवदूताबद्दल जाणून घेऊ या. ह्या व्यक्तीने गेल्या साठ वर्षांच्या कालावधीत असंख्य वेळा रक्तदान करून आजवर चोवीस लाख मुलांचे प्राण वाचविले आहेत. ही घटना खरे तर अविश्वसनीय वाटते, पण ह्या घटनेची पुष्टी अधिकृत रित्या केली गेली आहे.

मिडिया रिपोर्ट्सच्या अनुसार ८१ वर्षीय जेम्स हॅरिसन ह्यांच्या रक्तामध्ये एक खास प्रकारची, दुर्मिळ असणारी अँटीबॉडी आहे, जी सर्वसाधारणपणे इतरांच्या रक्तामध्ये सापडत नाही. ह्या अँटीबॉडीला ‘अँटी डी ‘ म्हटले जाते. ही अँटीबॉडी गर्भामध्ये वाढणाऱ्या अर्भकाच्या मेंदूला कोणत्याही प्रकारचे नुकसान न होण्यासाठी तसेच इतर कोणतेही घातक विकार न होऊ देण्यास सहायक आहे. जेम्स ने अनेकवेळा केलेल्या रक्तदानामुळे त्यांच्या रक्तामधील ही अँटीबॉडी अनेक अर्भकांना दिली गेल्याने आजवर चोवीस लाख अर्भकांचे प्राण वाचू शकले आहेत. त्या अर्भकांपैकी अनेक मुले आज निरोगी जीवन जगत आहेत.

गेल्या साठ वर्षांमध्ये जेम्स ह्यांनी ११७३ वेळा रक्तदान केले असून, हा आकडा विक्रमी म्हणता येईल. आजवर इतके वेळा रक्तदान करणाऱ्या जेम्सना आता मात्र त्यांचे वय लक्षात घेऊन, डॉक्टरांनी रक्तदान करण्यास मनाई केली आहे. आता वयाची ऐंशी वर्षे पार केलेल्या जेम्सना, आपण रक्तदान करू शकत नाही ह्या गोष्टीची खंत आहे. पण त्यांनी आजवर केलेल्या रक्तदानामुळे आज हजारो मुले सुखाचे, निरोगी जीवन जगत असल्याचे समाधान त्यांना आहे. १९६४ सालापासून ते अगदी अलीकडच्या काळापर्यंत जेम्स करीत असलेल्या रक्तदानामुळे आज सुमारे चोवीस लाख अर्भकांचे प्राण वाचू शकले आहेत.

Leave a Comment