मुंबापुराची यावेळेस तुंबापुरी झाल्यास राज्य सरकार जबाबदार – मुंबई महापौर


मुंबई – यावेळी पावसाळ्या दरम्यान मुंबापुराची यावेळेस तुंबापुरी झाल्यास महापालिका प्रशासन जबाबदार नसेल, असे वक्तव्य महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केले आहे. त्यांनी हे वक्तव्य नाले सफाईच्या कामाची पाहणीसाठी आले असताना केले आहे.

दरवर्षी करोडोंची उधळपट्टी पावसाळ्याआधी करून मुंबईतील नाल्याची सफाई केली जाते. पण नालेसफाई होऊन देखील पावसाळ्यात मुंबईमध्ये पाणी भरण्याचे प्रमाण काही कमी होताना काही दिसत नाही. २ एप्रिलपासून यावर्षी देखील मुंबईमध्ये नाले सफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. बुधवारी याच कामाचा आढावा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी घेतला. पण महापौरांनी या पहाणी दौऱ्यादरम्यान यंदा मुंबईमध्ये पाणी साचल्यास त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा आरोप केला आहे.

मुंबईमध्ये राज्य सरकारच्यावतीने मेट्रोची कामे सुरू आहेत. पर्जन्य वाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्या या कामामुळे तोडून टाकण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात त्यामुळे जर मुंबईमध्ये पाणी भरले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असेल, असा आरोप महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी केला. याबाबत राज्य सरकारने जबाबदारी झटकून चालणार नाही, असे देखील त्यांनी सांगितले. तसेच राज्य सरकारने मुंबई महानगर पालिकेची परवानगी न घेता कामे सुरू केली असल्यामुळे त्यांनी जबाबदारी घ्यायला हवी असे देखील महापौरांनी यावेळी सांगितले. यावेळी उपमहापौर हेमांगी वरळीकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव तसेच सभागृह नेते देखील उपस्थित होते.