सामोसा नक्की कोणाचा भाऊ ?


चहाच्या जोडीने आवडीने खाल्ला जाणारा सामोसा हा पदार्थ मूळचा भारतीय आहे किंवा नाही ह्यावर अनेक चर्चा ऐकायला मिळत असतात. ह्या बाबत अतिशय रोचक माहिती देणारा व्हिडियो ‘स्क्रोल.इन ‘ च्या वतीने यू-ट्युबवर प्रसिध्द करण्यात आला आहे. खरे तर सामोसा हा पदार्थ प्राचीन काळामध्ये मध्य आशियातील व्यापाऱ्यांच्याबरोबर भारतामध्ये आला. त्या काळी हा पदार्थ प्रवासामध्ये खाण्यासाठी बरोबर नेण्यास म्हणून खास बनविला जात असे. लहान, त्रिकोणी आकराच्या ह्या सामोश्यांच्यामध्ये खिमा, आणि मसाले ह्यांचे मिश्रण भरलेले असे. त्यावेळी प्रवास करीत असताना मुक्कामाच्या ठिकाणी, रात्रीच्या वेळी शेकोटी पेटवून सर्वजणे एकत्र होत आणि त्यावेळी ह्या सामोश्यांची मेजवानी असे. सामोसे हा पदार्थ टिकून रहात असल्याने हा पदार्थ खास प्रवासामध्ये सोबत नेण्यास उपयोगी पडत असे.

‘ऑक्सफोर्ड कम्पॅनियन ऑफ फूड’ ह्या पुस्तकामध्ये असलेल्या उल्लेखाच्या नुसार भारतामध्ये प्रचलित असलेला सामोसा, इजिप्त, मध्य आशिया, झांझिबार आणि पश्चिम चीनमध्ये प्रचलित व्यंजनाशी मिळता-जुळता आहे. किंबहुना त्याच पदार्थांवरून प्रेरित होऊन भारतामध्ये सामोसा प्रचलित झाला असावा. अकराव्या ते तेराव्या शतकातील अरब खाद्यपदार्थांच्या लिखित संग्रहांमध्ये ह्या पदार्थाचा उल्लेख ‘सानबुसक’ ह्या नावाने केलेला आढळतो. हेच नाव आजच्या काळातही इजिप्त, सिरीया आणि लेबानन देशांमध्ये प्रचलित आहे. ह्यालाच ‘सानबुसाक’ किंवा ‘सानबुसाज’ ह्या नावांनीही ओळखले जाते. हे शब्द पर्शियन भाषेतील ‘सानबोसाग’ ह्या शब्दावरून आले आहेत.

ह्या ‘सानबुसाज’ची स्तुती करणारी कविता, नवव्या शतकामध्ये इशाक़ इब्न इब्राहीम अल मौसिली ह्यांनी लिहून ठेवली आहे. ह्यावरून ह्या पदार्थाचा इतिहास किती शतके जुना आहे, हे आपल्या लक्षात येते. चौदाव्या दशकाच्या सुरुवातीला सामोश्याचे आगमन भारतामध्ये झाले आणि हा पदार्थ राजा-महाराजांच्या दरबारी बनविल्या जाणाऱ्या खास पदार्थांच्या यादीमध्ये समाविष्टही झाला. तेराव्या शतकामध्ये आमीर खुस्रो ह्यांनी, दिल्लीच्या सुलतानांच्या दरबारी हा पदार्थ विशेष पसंत केला जात असल्याचा उल्लेख आपल्या लेखनामध्ये केला आहे. त्या वेळी सामोसा तयार करण्यासाठी खिमा, तूप, कांदे आणि अनेक तऱ्हेचे मसाले वापरले जात असल्याचा उल्लेख आहे.

१३३४ साली इब्न बतुता ह्यांनी ‘साम्बुसक’ चा उल्लेख आपल्या लेखनामध्ये करीत, मटणाचा खिमा, बदाम, पिस्ते, कांदे आणि अनेक सुवासिक मसाले एकत्र करून, त्याचे सारण भरून तयार केला गेलेला हा पदार्थ अतिशय स्वादिष्ट’ असल्याचे म्हटले आहे. ‘ऐन-ऐ-अकबरी’ मध्ये ‘सानबुसा’ हा पदार्थ राजा-महारजांच्या मेजवानीची खासियत असल्याचे उल्लेख आहेत. आजच्या काळामध्ये सामोश्याचे, बटाटे, मटार आणि मसाले वापरून तयार केलेले शाकाहारी रूप आपल्या जास्त परिचयाचे असले, तरी सामोसा त्याच्या मूळ रूपातही अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. किंबहुना आता भारतभर हा पदार्थ निरनिराळ्या प्रकारे बनविला जात असतो. अनेक ठिकाणी उकडलेल्या बटाट्यांच्या सोबत फ्लॉवर, कोबी, गाजरे, इत्यादी भाज्यांचा वापर सारण बनविण्यासाठी केला जातो. तर बंगालमध्ये काही ठिकाणी सामोश्यामध्ये ‘रबडी’, म्हणजेच घट्ट बासुंदी भरलेली पाहायला मिळते. सामोश्यातले सारण कोणत्याही प्रकारचे असो, भारतामध्ये हा खाद्य पदार्थ आजच्या तारखेला ‘सुपर हिट’ आहे असे म्हणायला नक्कीच हरकत नाही.

Leave a Comment