ह्या शापित गावामध्ये एकाही महिलेला होत नाही संतानप्राप्ती


भोपालपासून १३० किलोमीटरच्या अंतरावर वसलेले हे गाव शापित समजले जाते. त्यामागे कारणही तसेच आहे. ह्या गावाच्या सीमेच्या आतमध्ये गेल्या चारशे वर्षांमध्ये एकही मूल जन्माला आलेले नाही. ह्या गावातील रहिवाश्यांच्या मान्यतेनुसार ह्या गावावर देवाची गैरमर्जी झाल्याने आजवर ह्या गावामधील एका ही कुटुंबामध्ये गावाच्या हद्दीमध्ये राहून संतानप्राप्ती होऊ शकलेली नाही.

श्यामजी नामक ह्या गावामध्ये एखाद्या महिलेला प्रसववेदना सुरु होताक्षणी, तिची तब्येत किती ही नाजूक असली, किंवा हवामान कितीही खराब असले, तरी तिला गावाच्या वेशीबाहेर नेले जाते. कारण जर ती महिला गावामध्ये राहिली, तर तिचे मूल जगत नाही अशी ग्रामस्थांची समजूत आहे. देवाचा श्राप गावाला लागल्यामुळे गावाच्या सीमेच्या आतमध्ये कुठलीही महिला प्रसूत झाली तर तिचे मूल जगणार नाही आणि जगलेच तर कोणत्या तरी गंभीर आजाराने ग्रासेल असा ग्रामस्थांचा विश्वास आहे. त्यामुळे महिलेच्या प्रसूतीपूर्वीच तिला गावाच्या सीमेतून बाहेर नेले जाते.

सोळाव्या शतकाच्या काळापासून हा श्राप ह्या गावावर असल्याचे गावच्या सरपंचांचे म्हणणे आहे. त्याकाळी गावामध्ये मंदिराचे निर्माण होत असताना एका महिलेने जात्यावर दळण दळण्यास सुरुवात केली. तिच्या दळणामुळे काही एक कारणाने मंदिराच्या निर्माणकार्यामध्ये व्यत्यय आला. त्याने क्रोधीत होऊन देवाने, ह्या गावाच्या हद्दीमध्ये एकही महिला प्रसूत होऊ शकणार नाही अस शाप दिला. तेव्हापासून एकाही महिलेची प्रसूती गावाच्या हद्दीत झाली नसल्याचे सरपंच म्हणतात.

जी हकीकत सरपंचांनी सांगितली, ती सत्य असल्याचे ग्रामस्थ म्हणतात. हा कोणत्याही प्रकारचा अंधविश्वास नसून ह्या शापाच्या सत्यतेचा प्रत्यय अनेकदा आला असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. ह्या गावात मद्यप्राशन आणि मांस भक्षण निषिद्ध मानले जाते.

Leave a Comment