चंद्रपुरातील आदिवासी विद्यार्थ्यांनी सर केले एव्हरेस्ट शिखर!


नवी दिल्ली – चंद्रपुरातील चार विद्यार्थी अखेर एव्हरेस्ट शिखरावर पोहचले असून गेल्या ११ एप्रिलला चंद्रपूर जिल्ह्यातील ३ शासकीय आश्रमशाळेचे दहा विद्यार्थी चंद्रपूरहून काठमांडूला गेले होते. तिथून त्यांचा प्रवास लासामार्गे माऊंट एव्हरेस्ट असा सुरू झाला होता. जगातील गिर्यारोहकांना भुरळ पाडणारा माउंट एव्हरेस्ट सर करण्यात आज मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे हे चंद्रपूर जिल्ह्यातील आदिवासी विद्यार्थी यशस्वी ठरले आहेत.

आदिवासी विद्यार्थ्यांतील नैसर्गिक काटक व धाडसीपणाला साद घालत एकात्मिक आदिवासी प्रकल्प चंद्रपूर, जिल्हा प्रशासन चंद्रपूर आणि आदिवासी विकास विभागाने ‘मिशन शौर्य’ची आखणी केली. हा वेगळा उपक्रम पहिल्यांदाच प्रधानसचिव मनिषा वर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली विभागातर्फे राबविण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील बोरडा, देवडा जिवती ब्लॉक्समधील आदिवासी कुटुंबांतील मनीषा धुर्वे, प्रमेश आळे, उमाकांत मडवी, कविदास कातमोडे, आकाश मडवी, आकाश अत्राम, शुभम पेंदोर, विकास सोयाम, इंदू कन्नाके, छाया आत्राम हे सर्व मुले-मुली आदिवासी विकास विभागाच्यावतीने गेल्या महिन्यात मिशन शौर्यवर निघाले होते.

या विद्यार्थ्याचे जुलै २०१७ पासून प्रशिक्षण सुरु झाले होते. या मुलांना प्रशिक्षकांकडून दार्जिलिंग, लेह लडाख या ठिकाणी गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्यात आले. हे विद्यार्थी गेल्या महिन्यात ११ एप्रिल रोजी मुंबईवरुन काठमांडुला रवाना झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल चे. विदयासागर राव यांच्यासह आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा यांनी या विद्यार्थ्याना मोहिमेवर जाण्यापूर्वी भेटून प्रेरणात्मक शुभेच्छा दिल्या होत्या. या मोहिमेच्या ह्या अंतिम टप्प्यासाठी त्यांच्याबरोबर सपोर्ट स्टाफ व व्यवस्थापकांबरोबरच १५ शेर्पा, एक तज्ज्ञ डॉक्टर सहभागी झाले होते.

Web Title: Everest peak by tribal students in Chandrapur!