वेल्लोर- दक्षिण भारतातील एक सुंदर पर्यटन स्थळ


दक्षिण भारतात पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सुंदर सुंदर स्थळे आहेत. मात्र प्राचीन शहर वेल्लोरचे महत्व आगळेच आहे. पलार नदीच्या काठी असलेले हे शहर तेथील किल्ल्यासाठी, मंदिरांसाठी आणि जवळच असलेल्या येल्गिरी या छोट्याश्या हिलस्टेशन साठी अवश्य भेट द्यावी असे आहे.


वेल्लोरचा प्रसिद्ध किल्ला १६ व्या शतकातील ग्रानाइटमध्ये बांधलेला असून त्याच्याभोवती पाण्याने भरलेला खंदक आहे. पूर्वी या खंदकात सुसरी असत. भोमी थिम्मा रेड्डी यांनी विजयनगरचा राजा कृष्णदेवराय याच्या कारकिर्दीत हा किल्ला बांधला. त्यानंतर तो आदिलशहाने जिंकला त्यानंतर मराठे आणि मग ब्रिटीश याच्या ताब्यात किल्ला होता. ब्रिटिशानि टिपू सुलतान आणि श्रीलंकेचा राजा विक्रम राजसिंग यांना या किल्ल्यात बंदी म्हणून ठेवले होते असा इतिहास आहे. १३३ एकर परिरसरात या किल्ल्याचा पसारा असून येथे जलकंठेश्वर मंदिर, मशीद आणि चर्च तसेच एक संग्रहालय आहे.


वेल्लोर पासून जवळ असलेले येल्गिरी हे छोटेसे हिल स्टेशन म्हणजे आदिवासी इलाका असून येथील प्राचीन मंदिरे, आदिवासी संस्कृती आवर्जून पहावी अशी आहेत. येथे साहसाची आवड असलेल्यांना पॅराग्लायडिंगची मजा लुटता येते. चारी बाजूनी हिरव्यागार पर्वतांनी वेढलेले हा भाग असून येथे दरवर्षी आंतरराष्ट्रीय पॅराग्लायडिंग फेस्टिवलचे आयोजन केले जाते. या भागात वर्षभर हवा खुशनुमार असते त्यामुळे कधीही येथे जाता येते.

Leave a Comment