असे आहे कोल्हापूरच्या मंदिराचे आणि तिरुपतीच्या देवस्थानाचे कनेक्शन


दररोज कोल्हापूरमध्ये एक खास ट्रेन, आंध्र प्रदेशातील तिरुपतीहून येत असते. ह्या ट्रेनमधून येणारे अनेक भाविक सरळ महालक्ष्मी मंदिरामध्ये महालक्ष्मी देवीच्या दर्शनाला जातात. ह्या दोन्ही देवास्थानानंचे नेमके कनेक्शन काय आहे, आणि तिरुपतीला जाणारे महालक्ष्मीच्या दर्शनाला आवर्जून का येतात असा प्रश्न पडतो. ह्या प्रश्नाचे उत्तर असे, की बालाजी तोवर प्रसन्न होणार नाहीत, जो वर त्यांची अर्धांगिनी महालक्ष्मी प्रसन्न होत नाही, अशी भाविकांची मान्यता आहे. आपल्या भारत देशामध्ये मंदिरे, देवदेवता ह्यांच्याशी संबंधित अनेक कथा, कहाण्या आहेत. तिरुपती आणि बालाजी देवस्थानाचे नाते हे ही त्या कहाण्यांपैकी एक आहे.

ह्या नात्यामागची कहाणी अशी, की भृगु ऋषी एकदा भगवान विष्णूंकडे आले. त्यावेळी विष्णू शेषशाई असून निद्रा घेत होते, तर त्यांची पत्नी लक्ष्मी त्यांचे पाय चेपीत होती. भगवान विष्णूंनी आपले स्वागत केले नाही ह्याचा राग येऊन महर्षी भृगु ह्यांनी भगवान विष्णूंच्या छातीवर जोराने लत्ताप्रहार केला. भृगु ऋषींचा क्रोध शांत करण्यासाठी भगवान विष्णूंनी त्यांची क्षमा मागितली, आणि भृगुंचे पाय चेपण्यास सुरुवात केली. ह्याद्वारे त्यांना भगवान भृगुंच्या प्रती आदरभावना व्यक्त करावयाची होती. भगवान विष्णूंचे हे वागणे पाहून देवी लक्ष्मींना क्रोध अनावर झाला. ह्या रागापायी त्यांनी वैकुंठ सोडले आणि देवी कोल्हापूर येथे येऊन राहिली. देवी लक्ष्मी वैकुंठामध्ये कधीही परतली नसून, आज ही कोल्हापूर मधील भव्य देवस्थानामध्ये महालक्ष्मींचा वास आहे अशी आख्यायिका आहे.

ही आख्यायिका जरी भाविकांच्या तोंडून ऐकायला मिळत असली, तरी ह्याचा पुराणांमध्ये किंवा इतर कोणत्याही धार्मिक ग्रंथामध्ये स्पष्ट उल्लेख सापडत नसल्याने ही आख्यायिका कितपत खरी आहे, हे नक्की सांगता येणार नाही. पण मंदिरामध्ये पाळल्या जाणऱ्या परंपरा विचारात घेतल्या तर महालक्ष्मी देवस्थान हे आदी शक्तीचे देवस्थान असल्याचे लक्षात येते. किंबहुना हे देवस्थान आदिशक्तीच्या १०८ पीठांपैकी एक मानले जाते. हे देवस्थान देवी पार्वतीला समर्पित असून ह्या देवस्थानामध्ये देवी अंबाबाई च्या रुपामध्ये असेलेल्या पार्वतीचे पूजन होते. आणखी एका आख्यायीकेच्या अनुसार येथील रयतीचे कोलासुर नामक दानावापासून रक्षण करण्यासाठी देवी येथे अंबाबाईच्या रुपात अवतरली असे म्हणतात. देवीने कोलासुराचा वध केला. मारण्यापूर्वी कोलासुराने ते ठिकाण त्याच्या नावाने ओळखले जावे असा वर देवीकडे मागितल्याने त्या ठिकाणाला कोल्हापूर असे नाव देण्यात आले असे ही आख्यायिका सांगते.

आणखी एका आख्यायिकेनुसार हे देवस्थान आदिशक्ती ला समर्पित असून, ह्या देवस्थानामध्ये भगवान शिवाचे गुप्त देवस्थान आहे असे म्हटले जाते. शक्ती संतुलित रहावी ह्याकरिता शिवही तेथे असल्याचा समज आहे. पण शिवाच्या देवस्थानमध्ये भाविकांना जाण्यास बंदी आहे. महालक्ष्मीच्या देवस्थानाचे तिरुपती देवास्थानाशी नाते सांगणारी कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसली, तरी कोल्हापूरचे देवस्थान कधी निर्माण केले गेले, ह्या बद्दल माहिती उपलब्ध आहे. हे देवस्थान सहाव्या शतकामध्ये चालुक्य वंशाच्या कर्णदेव राजाने बनवविले. पण ह्या देवस्थानाला खरी प्रसिद्धी मिळाली, ती ११८२ साली, जेव्हा शिलाहार राजवंशाने कोल्हापूर आपली राजधानी म्हणून घोषित केले.

चौदाव्या शतकामध्ये परप्रांतीयांची आक्रमणे सुरु झाल्यानंतर त्यांनी देवस्थाने लुटण्याचा चंग बांधला. त्यावेळी मुख्य देवास्थानातून देवी हलविण्यात येऊन, तिची स्थापना मंदिराच्या एका पंडिताच्या घरी करण्यात आली. तिथे देवी सतराव्या शतकापर्यंत राहिली. त्यानंतर सतराव्या शतकामध्ये छत्रपती राजे संभाजी ह्यांनी मूळ देवस्थानमध्ये देवीची पुनश्च प्रतिष्ठापना करविली. तेव्हा त्यांनी गोव्याहून काबीज करून आणलेली एक भली मोठी घंटा देवस्थानाला भेट दिली. विशेष गोष्ट अशी की ह्या घंटेवरील कोरलेली अद्याक्षरे लॅटीन भाषेतील आहेत. महाराणी ताराबाईंच्या वेळी त्यांचा महाल मंदिरानजीक बांधला गेला. त्यावेळी महाराणी ताराबाई ह्यांनी मंदिरामध्ये अनेक दुरुस्त्या आणि नवी बांधकामे करविली.

दर वर्षी, वर्षातून दोनदा साजरा होणारा ‘किरणोत्सव’ हा सोहोळा ह्या मंदिराचे वैशिष्ट्य आहे. दर वर्षी ३१ मार्च रोजी आणि ९ नोव्हेंबर रोजी हा सोहोळा साजरा केला जातो. ह्या दिवशी उगवित्या सूर्याची किरणे महालक्ष्मीच्या पायांशी पडतात. हा सोहोळा पाहण्यासाठी, अनुभविण्यासाठी हजारो भाविक आवर्जून कोल्हापूरमध्ये येत असतात.