घरामध्ये चांदीचा हत्ती ठेवणे मानले जाते शुभ


प्राचीन वेदशास्त्रांच्या नुसार आपल्या घरामध्ये किंवा आपण काम करीत असलेल्या ठिकाणी, आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये सकारत्मक शक्तीचे, उर्जेचे संचरण व्हावे ह्या करिता अनेक उपाय सुचविले गेले आहेत. काही शास्त्रांच्या नुसार तर काही विशिष्ट उपायांनी आर्थिक सुबत्ता येत असून, यशाच्या वाटेमध्ये आलेली कोणत्याही प्रकारची अडचण दूर होते. हिंदू धर्मामध्ये हत्तीला पवित्र मानले गेले आहे. विघ्नहर्ता गणेश आपल्याकडे आराध्य दैवत मानले गेले असून हत्ती गणेशाचे प्रतिक आहे. आपल्याला हत्ती प्रत्यक्षात पाळणे अशक्य असल्याने घरामध्ये हत्तीची प्रतिमा किंवा मूर्ती असणे शुभ मानले गेले आहे.

वास्तू शास्त्राच्या नियमानुसार हत्ती पाळणे किंवा हत्तीला खाऊ घालणे अतिशय शुभफलदायी मानले गेले आहे. पण हे प्रत्येकाला आपल्या घरी करता येणे शक्य नाही. त्यामुळे वास्तू शास्त्रानुसार प्रत्येकाने आपल्या घरामधे शक्य असल्यास चांदीने बनविलेल्या हत्तीची लहान मूर्ती आणणे श्रेयस्कर मानले गेले आहे. अशी मूर्ती घरामध्ये आणल्याने घरामध्ये आर्थिक सुबत्ता येत असल्याचे म्हटले जाते. तसेच घरामध्ये कोणत्याही प्रकारचा वास्तू दोष असल्यास हत्तीची चांदीची मूर्ती घरामध्ये ठेवल्याने वास्तुदोष नष्ट होऊन सकारात्मक उर्जेचे घरामध्ये संचरण होते.

घरामध्ये ठेवल्या जाणाऱ्या हत्तीची मूर्ती कशी असावी ह्याबद्दल काही ठराविक ठोकताळे नाहीत. त्यामुळे आपल्याला योग्य वाटेल त्याप्रमाणे चांदीच्या हत्तीची लहान किंवा मोठी मूर्ती आपण घरामध्ये आणू शकता. जर चांदीची मूर्ती आणणे शक्य नसेल, तर हत्त्तीची चंदेरी रंगाची प्रतिमा घरामध्ये ठेवल्यानेही इच्छित परिणाम साध्य होतात. ह्यामुळे आर्थिक सुबत्ता येतेच शिवाय उन्नतीच्या दृष्टीने सतत नव-नवीन संधी चालून येतात. घरामध्ये चांदीची हत्तीची मूर्ती किंवा प्रतिमा आणल्यास ती घरामध्ये उत्तरेला ठेवावी.

Leave a Comment