२ हजार वर्षापूर्वीचे उज्जैनचे शनी मंदिर


राजा विक्रमादित्य आणि त्याला अनेक जटील प्रश्न विचारणारा वेताळ, राजाने उत्तर देण्यासाठी मौन सोडले कि पुन्हा झाडावर जाऊन लटकणारा आणि राजाने पुन्हा झाडावरून पाठीवर घेतलेला वेताळ याच्या गोष्टी बहुतेक सर्वांनी लहानपणी ऐकलेल्या असतात. हा विक्रमादित्य राजा खरोखर होता का याचे ठोस पुरावे नसले तरी या राजाने स्थापन केलेले शनी मंदिर उज्जैन या मध्यप्रदेशातील पवित्र स्थळी आहे आणि हे मंदिर २ हजार वर्षे जुने आहे याचे संदर्भ मिळतात.


आज देशभर शनी जयंती साजरी होत आहे. ज्योतिष शास्त्र सांगते ज्याच्या राशीला शनी येतो त्याचे आयुष्य खडतर बनते यालाच शनीची साडेसाती म्हणतात. उज्जैनचे हे प्राचीन मंदिर क्षिप्रा नदीच्या काठी असून वास्तविक हे नवग्रह मंदिर आहे. या मंदिरातील प्रतिमा राजा विक्रमादित्याने स्थापन केली असल्याची पौराणिक मान्यता आहे. या मुख्य प्रतिमेशिवाय आणखी एक प्रतिमा येथे असून तिला धय्या शनी असे म्हटले जाते. ज्यांना साडेसाती सुरु आहे ते या शनिवार तेल वाहतात. त्यामुळे साडेसाती तसेच अन्य त्रास कमी होतात असा समज आहे.

उज्जैन पूर्वी अवंतिकानगरी म्हणून ओळखले जात असे. हे प्राचीन शहर आता महाकालेश्वर या ज्योतिर्लिंगाचे स्थान आहे. दरवर्षी शनी जयंतीला येथे मोठी यात्रा भरते आणि देशभरातून भाविक त्यासाठी उपस्थित असतात.

Leave a Comment