नव्या खराब नोटांचे नेमके करायचे काय? आरबीआयच्या अॅक्टमध्ये उल्लेखच नाही!


नवी दिल्ली – आता जवळपास दीड वर्ष रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाकडून २०० आणि २००० च्या नोटा जारी करुन झाले आहे. पण जर एखाद्या कारणामुळे तुमच्याजवळ असलेली २०० किंवा २००० रुपयांची नोट खराब झाली तर ती नोट तुम्ही बँकेतही जमा करु शकत नाही किंवा ती नोट बदलवून देखील घेऊ शकणार नाही. कारण, या नव्या नोटांचा चलनातील नोटा बदलवण्याच्या नियमांमध्ये समावेश करण्यातच आलेला नसल्याचे वृत्त इकॉनॉमिक टाइम्सने दिले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, आरबीआयच्या ‘नोट रिफंड’ नियमामध्ये तुटलेल्या-फाटलेल्या नोटा बदलवणे ( नोट एक्सचेंज) हे येते. आरबीआय एक्टच्या कलम २८चा हा भाग आहे. ५, १०, ५०, १००, ५००, १०००, ५००० आणि १०,००० च्या चलनी नोटांचा यामध्ये उल्लेख आहे, पण, यामध्ये २०० आणि २००० च्या नोटांचा समावेश नाही. कारण या नोटा बदलवण्याच्या नियमांमध्ये सरकार आणि आरबीआयने बदल केलेला नाही.

खूप कमी नव्या नोटा खराब होण्याचे प्रकार समोर आले असल्याची माहिती बॅंकर्सनी दिली. पण हे नियम लवकरच बदलले नाहीत तर अडचणींचा सामना करावा लागू शकेल असा इशारा बॅंकर्सकडून देण्यात आला आहे. अर्थ मंत्रालयाला वर्ष २०१७ मध्येच नियम बदलण्याबाबत पत्र पाठवल्याचा दावा आरबीआयने केला आहे. पण सरकारकडून आरबीआयला अद्याप कोणतेही उत्तर मिळालेले नाही.

Leave a Comment