ही आहेत जगातील सर्वात धोकादायक ठिकाणे


थरारक आणि काही तरी धाडसी करून पाहण्याच्या इच्छेपायी अनेक चित्र विचित्र कारनामे लोक करीत असताना आपण पाहतो, ऐकतो. तसेच काही तरी थरारक करायचे ह्यासाठी सतत नवनवीन ठिकाणच्या शोधामध्ये हे लोक असतात. ही ठिकाणे जितकी जास्त धोकादायक, भीतीदायक, तितका ह्या लोकांना त्यांतून आनंद, थरार अनुभवायला मिळतो. त्यासाठी हे लोक अनेक ठिकाणे ‘एक्सप्लोअर’ करीत असतात. ह्या जगामध्ये अशी अनेक ठिकाणे आहेत, जिथे पोहोचण्यासाठी किंवा तिथे जाऊन काही तरी चित्तथरारक करणे म्हणजे मानवी धैर्याची परिसीमा आहे. ही ठिकाणे इतकी विचित्र, धोकादायक आहेत, की इथे जाऊन काही तरी करून दाखविण्याच्या नादामध्ये अनेक उत्साही मंडळींना आपले प्राण देखील गमवावे लागले आहेत.

टांझानिया येथील नेटरॉन सरोवर असेच एक ठिकाण आहे. ह्या सरोवरापाशी जो कोणी गेला, तो कधीही जिवंत परतला नाही असे म्हटले जाते. जर गुगलवर ह्या सरोवराची चित्र पाहिली, तर इथे कोणतेही प्राणी, पक्षी जीवित असलेले पहावयास मिळत नाहीत. ह्याचे कारण हे की ह्या सरोवरामध्ये अल्कली सॉल्ट क्रस्ट आहे. हे अतिशय धोकादायक असून, ह्याच्या संपर्कात आलेला कोणताही जीव आपले प्राण गमावतो. ह्या सरोवराच्या पाण्यातून येणारा हायड्रोजन सल्फाईडचा तीव्र गंध ह्या ठिकाणी कोणाला फार काळ थांबून राहणे अशक्य करणारा आहे.

ब्राझीलच्या जवळ समुद्रामध्ये स्थित असलेल्या ह्या द्वीपावर जाणे मोठ्या हिम्मतीचे काम आहे. ‘इहा किमाडा ग्रान्डे’ नामक ह्या द्वीपावर हजारो विषारी सर्प आहेत. येथे पावला-पावलागणिक अतिविषारी साप आहेत. ह्या ठिकाणी जाण्याने उद्भवू शकणारा धोका लक्षात घेऊन ब्राझील सरकारने ह्या ठिकाणी पर्यटकांना जाण्यास बंदी केली आहे. तसेच इथियोपिया येथील ‘इर्ता एल’ हा ज्वालामुखी जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. ह्या परिसरामध्ये लाव्हाचे दोन झरे आहेत. येथे जाणे देखील प्राण जाणून बुजून धोक्यात घालण्यासारखेच आहे.

थायलंड मधील एलीफंट किंग्डमचा हत्तीशी काहीही संबंध नाही. इथे असणाऱ्या तलावामध्ये शेकडो मगरी, सुसरी आहेत. येथे पिंजऱ्यामध्ये उभे राहून मगरींना खाऊ घालण्याची संधी पर्यटकांना मिळते. पण खाण्याच्या मोहाने तलावाच्या बाहेर येऊन मगरींनी तिथे असलेल्या पर्यटकांवर हल्ला केल्याचे अनेक किस्से ह्या ठिकाणी घडले आहेत. इंडोनेशिया येथील सिनाबुंग ज्वालामुखी हा देखील सक्रीय ज्व्लालामुखी आहे. ह्याच्या आसपास वसलेल्या गावांमध्ये सतत ह्या ज्वालामुखीतून उसळणाऱ्या राखेचे ढिगारे पहायला मिळतात. ह्या ज्वालामुखीचा उद्रेक वरचेवर होत राहतो.

रशिया येथील ‘व्हॅली ऑफ डेथ’ नावाप्रमाणेच मृत्यूचे भय उत्पन्न करणारी आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक मनुष्याची तब्येत खराब होतेच होते असे काहीतरी विचित्र ह्या जागेमध्ये भरून राहिले आहे. त्याचप्रमाणे बोलिव्हिया येथील मदीदी अभयारण्यामध्ये जगातील सर्वाधिक विषारी वनस्पती आहेत. ह्या वनस्पतींच्या केवळ संपर्कात येण्याने देखील भयानक इन्फेक्शन उद्भवू शकतात. अमेरीकेतील ‘डेथ व्हॅली’ मध्ये तापमान ५७ अंशांच्या घरात असते. म्हणून हे ठिकाण जगातील सर्वात उष्ण प्रदेशांपैकी एक मानले जाते. ह्या ठिकाणी मनुष्य पाण्याशिवाय केवळ चौदा तास जगू शकतो असे म्हटले जाते. अमेरीकेतील आणखी एक धोकादायक ठिकाण म्हणजे ‘माउंट वॉशिंग्टन’. येथे हवामानाचा पारा -४० अंशांखाली उतरला असून, ह्या जागेचे नाव विश्वविक्रम म्हणून नोंदलेले आहे. ह्या ठिकाणी एका वेळी ताशी ३२७ किलोमीटर वेगाने वारे वाहिले असल्याची अधिकृत नोंद आहे.

मार्शल द्वीप ह्या ठिकाणी असलेल्या ‘बिकिनी अतोली’ ह्या ठिकाणी अनेक अणुस्फोट केले गेले असून, ह्या ठिकाणी रेडियो अॅक्व्टीव्ह वस्तूंचा खच पडलेला आहे. हे ठिकाण दिसायला अतिशय नयनरम्य दिसत असले तरी तितकेच धोकादायकही आहे.

Leave a Comment