घरात बेसमेंट बनविताना घ्या ही खबरदारी


परदेशामध्ये स्वतंत्र घरे बनविताना घराला तळघर किंवा बेसमेंटही बनविण्याची पद्धत आहे. ह्या बेसमेंटचा वापर सामान साठविण्यासाठी करण्याच्या ऐवजी, तिथे ही, घरी येणाऱ्या पाहुणे मंडळींच्या झोपण्यासाठी अतिरिक्त बेडरूम्स, एखादे लहानसे किचन, बार काऊंटर, लिव्हिंग एरिया अश्या प्रकारची रचना जास्त पसंत केली जाते. ही पद्धत हळू हळू भारतामध्येही रूढ होत आहे. एकतर जागेच्या कमतरतेमुळे घरामध्ये अतिरिक्त खोल्या बनविणे कठीण असते. त्यामुळे स्वतंत्र घरांना बेसमेंट बनविण्याची कल्पना आता रूढ होत आहे. मोठमोठ्या मॉल्स मध्येही गाड्यांच्या पार्किंग साठी बेसमेंट बनविली जात असतात. पण वास्तूशास्त्रानुसार बेसमेंट कुठे आणि कसे बनविले जावे यासाठी काही नियम दिले गेले आहेत.

वास्तू शास्त्राच्या नियमानुसार बेसमेंट बनविण्यासाठी भूखंडाच्या उत्तरेला, पूर्वेला, किंवा उत्तर-पूर्वेला बनविले जावे. भूखंडाच्या मधोमध, पश्चिमेला, किंवा दक्षिणेला बेसमेंट बनविणे अशुभ मानले गेले आहे. उत्तर-पश्चिम दिशेला बेसमेंट बनविले गेल्यास आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागू शकते. तसेच अस्थिरता, रोगराई, व्यापारामध्ये नुकसान होण्याचीही शक्यता असते. जर बेसमेंटच्या वर ईशान्येला पाण्याची टाकी किंवा नळ असला, तर ते वास्तूशास्त्रामध्ये शुभ मानले गेले आहे.

बेसमेंट बनविले जात असताना त्याची छतापर्यंतची उंची किमान नऊ फुट असावी. तसेच त्याचा पायाही जरा उंच असावा, जेणेकरून त्यामध्ये हवा खेळती राहील आणि नैसर्गिक प्रकाश उपलब्ध असेल. जर नैसर्गिक प्रकाश उपलब्ध नसेल, तर आरसे वापरून सूर्याचा प्रकाश आतपर्यंत परावर्तीत करणे देखील शक्य होऊ शकते. नैसर्गिक प्रकाश बेसमेंट मध्ये असणे शुभ मानले गेले आहे. बेसमेंट जमिनीवर ज्या पातळीवर असेल, त्याच्या आसपास इतर कोणतेही बांधकाम नसावे. बेसमेंटहच्या भिंतींना रंग देताना काळा, किंवा निळा रंग वापरू नये. त्या ऐवजी हलक्या रंगांचा वापर केला जावा.

बेसमेंटचा उपयोग कायमस्वरूपी निवासाप्रमाणे केला जाऊ नये. त्यामुळे आरोग्यासंबंधी तक्रारी उद्भवू शकतात. व्यवसाय, पूजा पाठ, अध्यात्म, सामान साठविण्यासाठी, बेसमेंटचा उपयोग फलदायी मानला गेला आहे. बेसमेंट मध्ये पूर्र्व, उत्तर आणि ईशान्येच्या दिशेला फारसे सामान न रचता त्या दिशेला पाण्याने भरलेला कलश किंवा भूमिगत पाण्याची टाकी असणेही शुभ मानले गेले आहे. ह्याच दिशांना शक्यतो खिडकी असावी. बेसमेंटच्या प्रवेशद्वारापाशी विंड चाइम्स असणे शुभ फळ देणारे आहे, तसेच ह्याने सकारात्मक उर्जेचे संचरण राहते. बेसमेंट मध्ये खाली उतरण्यासाठीचा जिना ईशान्येला किंवा पूर्वेला असावा. बेसमेंट मध्ये शक्यतो बाथरूम बनवू नये. तसेच एक्झॉस्ट फॅन बेसमेंटमध्ये लावायचा असल्यास पूर्वेला किंवा आग्नेय दिशेला असावा.

Leave a Comment