नाहरगड मध्ये भटकत होता नाहारसिंग भोमियाचा आत्मा


जयपूरच्या प्रसिद्ध अमेर फोर्टच्या सुरक्षेसाठी म्हणून बांधला गेलेला आरवली पर्वतरांगातील नाहरगड किल्ला त्याच्या सौंदर्यासाठी जसा प्रसिद्ध आहे तसेच या गडावरून दिसणारे जयपूर हे गुलाबी शहर पाहणेही तितकेच मनोरम्य आहे. हा किल्ला सवाई राजा जयसिंग द्वितीय याने १७३४ मध्ये बांधला तेव्हा त्याचे नाव सुदर्शनगड होते असे इतिहास सांगतो. त्यानंतर त्याचे नाव नाहरगड केले गेले. त्यामागे अशी कथा सांगतात कि या जागी नाहरसिंग भोमर राजपूत याचा आत्मा भटकत होता आणि तो बांधकामात अडथळे आणत असे. त्यावर तांत्रिकाचा सल्ला घेतला गेला तेव्हा त्याने त्याचे नाव किल्ल्याला देण्यास सुचविले. त्यानंतर हा गड बांधून पूर्ण झाला.


१८६८ मध्ये राजा सवाई रामसिंग याने या गडाचा विस्तार केला. १८८३-९२ मध्ये सवाई राजा माधोसिंग यांनी त्याकाळी ३ ते साडेतीन लाख रुपये खर्च करून अनेक महाल येथे बांधले. त्यातील माधवेंद्र महाल आवर्जून पाहण्यासारखा आहे. येथील सर्व खोल्या छोट्या छोट्या पॅसेजनी जोडलेल्या आहेत. त्यावर सुंदर भित्तीचित्रे रेखाटली गेली आहेत. १९४४ पर्यंत जयपूर सरकार या गडाचा वापर कार्यालयीन कामासाठी करत असे. या किल्ल्याच्या परिसरात पडाव नावाचे रेस्टोरंट असून तेथून सूर्यास्त खूपच सुंदर दिसतो.

Leave a Comment