एकदा जरूर ‘ओनियन चहा’चा आस्वाद घेऊन पहा


ओनियन चहा किंवा चक्क कांदा घालून केलेला चहा आवर्जून प्यायला हवा असे म्हटल्यावर जरा गोंधळल्यासारखे होते. आल्याचा चहा, इलायची घालून केलेला चहा, अलीकडच्या काळामध्ये लोकप्रिय होत असलेल्या ग्रीन टी, किंवा हर्बल टीच्या निरनिराळ्या तऱ्हा आपल्या परिचयाच्या असल्या तरी ओनियन टी आपल्यासाठी काहीसा नवा आहे. पण हा चहा आपल्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय फायदेशीर असून हा चहा आपल्या आहारामध्ये समाविष्ट केला जावा असे आहारतज्ञांचे मत आहे. ह्या मध्ये असलेली तत्वे शरीराचे निरनिराळ्या लहान मोठ्या विकारांपासून संरक्षण करीत असल्याने हा चहा घेणे लाभकारी आहे.

तज्ञांच्या नुसार ओनियन टी किंवा कांद्याचा चहा अनिद्रा, उच्चरक्तदाब, कर्करोग, हाय ब्लडशुगर, अनिमिया, पोटासंबंधी काही विकार इत्यादींसाठी अतिशय लाभकारी आहे. तसेच ह्या चहाच्या नियमित सेवनाने वजन घटण्यास मदत होते. सुरुवातीला हा चहा पिणे थोडेसे कठीण वाटेल, पण जेव्हा ह्याचे सेवन नियमित केले जाईल तेव्हा ह्याचे लाभ नक्कीच दिसून येऊ लागतील.

हा चहा बनविण्याकरिता एका भांड्यामध्ये दोन कप पाणी घ्यावे. त्यामध्ये कांदा सोलून घेऊन त्याचे लहान लहान तुकडे करून घालावेत. हे पाणी कांद्यासकट उकळावे. जेव्हा हे पाणी आटून एक कप इतके होईल, तेव्हा तेव्हा हे पाणी गाळून घेऊन जरा निवू द्यावे. पाणी कोमट असताना त्यामध्ये चार ते पाच थेंब लिंबाचा रस घालावा आणि आपल्या आवडीच्या फेल्वरच्या ग्रीन टी ची एक टी-बॅग ह्यामध्ये घालावी. तीन ते चार मिनिटे ही टी-बॅग चहामध्ये राहू देऊन मग ती काढून टाकावी. जर आवडत असेल, तर ह्यामध्ये चवीप्रमाणे मध घालावे. अश्या प्रकारे ओनियन टी तयार करावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment