कच्च्या कांद्याचे फायदे अनेक


स्वयंपाक घरामध्ये केलेला असो, किंवा हॉटेलमध्ये, त्यामध्ये कांद्याचा वापर निश्चितपणे केला जातो. त्यामुळे पदार्थाला आणखी चव येते. कांद्याचे सेवन, विशेषतः कच्च्या कांद्याचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आवर्जून करणे अगत्याचे आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बाहेर उष्ण वारे असतात. ह्यालाच ‘लू’ किंवा ‘लाय’ असेही म्हटले जाते. कांद्याच्या सेवनाने शरीरामध्ये थंडावा निर्माण होत असून, उन्हाच्या तडाख्यामुळे किंवा लू मुळे शरीराला हानी पोहोचत नाही. ज्यांना उष्णतेचा त्रास होतो, उन्हाळ्यामध्ये नाकातून रक्त येणे किंवा शरीरामध्ये उष्णता वाढणे, हाता-पायांच्या तळव्यांची आग होणे अश्या तक्रारी ज्यांच्या बाबतीत उद्भवितात, त्यांनी कच्च्या कांद्याचे नियमित सेवन करावे, किंवा कांद्याच्या रसाचे सेवन करावे. कच्च्या कांद्याचा रस तळपायांना चोळल्याने देखील उष्णतेचा त्रास कमी होतो.

कच्च्या कांद्याचा रस केसांच्या मुळांशी लावला असता, केसांची वाढ भरपूर होऊन केस दाट होतात. ह्यासाठी कांद्याचा रस केसांमध्ये लावून एक तास राहू द्यावा. त्यानंतर कोमट पाण्याने केस धुवून टाकावेत. तसेच कच्चा कांदा अर्धा चिरून केसांवर आणि केसांच्या मुळांशी रगडल्यास केसगळती थांबते, व नवे केसही उगवू लागतात. कांद्यामध्ये शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविणारी तत्वे आहेत. तसेच अनेक तऱ्हेच्या त्वचा रोगांमध्येही कच्च्या कांद्याचा रस लाभकारी आहे. रक्तदाबाचा विकार असणाऱ्यांसाठी कच्चा कांदा अतिशय लाभकारी आहे. ह्याच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. त्यामुळे ह्या व्यक्तींनी दररोजच्या जेवणामध्ये कच्चा कांदा आवर्जून खाल्ला पाहिजे.

सांधेदुखीचा त्रास असेल, तर मोहोरीच्या तेलामध्ये कच्च्या कांद्याचा रस घालून त्याने दुखऱ्या सांध्यांची मालिश केली असता दुखणे कमी होते. एक महिनाभर ह्या तेलाने मालिश केली असता दुखणे पुष्कळ अंशी कमी होते. ज्यांना किडनी स्टोन्स असतील, त्यांनीही कच्चा कांदा आपल्या आहारामध्ये समाविष्ट करावा. स्टोन्समुले होणाऱ्या वेदना कच्च्या कांद्याचा रस दररोज सकाळी उपाशीपोटी घेतल्याने पुष्कळ अंशी कमी होतात.

कच्च्या कांद्यामध्ये असलेले फॉसफोरिक अॅसिड रक्त शुध्द करण्यास सहायक आहे. तसेच ज्यांच्या शरीरातील शिरांमध्ये वेदना होतात, त्या व्यक्तींनी वेदना होत असलेल्या ठिकाणी रात्री झोपण्यापूर्वी कच्च्या कांद्याच्या रसाने मालिश करावी. हा उपाय सलग एक महिना केल्याने वेदना पुष्कळ अंशी कमी होतील.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment