
नवी दिल्ली – केंद्र सरकारने फेसबुकवरील डेटा चोरीसंदर्भात पाठवलेल्या नोटीसवर फेसबुकने अखेर उत्तर दिले आहे. युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही अनेक महत्त्वाचे बदल केले असल्याचे उत्तर फेसबुकने दिले आहे. तर अद्याप केंद्राला केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीने प्रतिसाद दिलेला नाही.
केंद्र सरकारच्या नोटीशीला फेसबुकचे उत्तर
अमेरिकेतील अध्यक्षपदाच्या निवडणुकीत केंब्रिज अॅनालिटिका या ब्रिटिश कंपनीने फेसबुकवरील युजर्सचा डेटा चोरल्याचे समोर आले होते. ८.७ कोटी फेसबुक युजर्सची माहिती गैरमार्गाने या कंपनीने गोळा केल्यामुळे फेसबुकच्या अडचणी वाढल्या होत्या. डेटा चोरीच्या प्रकरणामुळे जगभरात एकच खळबळ उडाली आणि फेसबुकच्या विश्वासार्हतेला तडा गेला.
मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात केंद्र सरकारने फेसबुक आणि केंब्रिज अॅनालिटिका या कंपनीला नोटीस बजावली होती. सरकारने युजर्सची माहिती फुटू नये, यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा तपशील मागितला होता. फेसबुकला या नोटीसला उत्तर देण्यासाठी दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली.
अखेर केंद्र सरकारला फेसबुकने उत्तर दिले आहे. नेमक्या काय उपाययोजना फेसबुकने राबवल्या आहेत, याचा तपशील समजू शकलेला नाही. पण युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही अनेक बदल केले असल्याचे फेसबुकने ईमेलमध्ये म्हटल्याचे सूत्रांनी सांगितले. फेसबुकच्या प्रवक्त्यांनी पाठवलेल्या ईमेलमध्ये केंद्र सरकारचे आभार मानण्यात आले आहे. सरकारने आम्हाला बाजू मांडण्याची संधी दिली, यासाठी आम्ही सरकारचे आभारी आहोत. युजर्सचा डेटा सुरक्षित राहावा, यासाठी आम्ही कटीबद्द आहोत.
