प्रत्येक देशामध्ये निराळा ‘अंड्याचा फंडा…’


जे लोक अंडी खातात, त्यांच्यासाठी अंड्याचे ऑमलेट ही अगदी परिचयाची आणि आवडीची वस्तू आहे. खरे तर अंड्याचे ऑमलेट हा काही भारतीय पदार्थ नाही, तर तो विदेशी लोकांकरवी आपल्याकडे आला आणि इथलाच होऊन गेला. अंड्याच्या ऑमलेट बद्दलच बोलायचे, तर प्रत्येक देशामध्ये हे बनविण्याची तऱ्हा निराळी, त्याची चव निराळी आणि ते खाण्याची पद्धतही निराळीच. काही देशांमध्ये ऑमलेट बनविताना त्यामध्ये इतर पदार्थ ही इतक्या मोठ्या प्रमाणावर घातले जातात, की ते मुळात अंड्याचे ऑमलेट आहे, हेच मुळी लक्षात येत नाही.

आपल्या देशामध्ये अंड्याचे ऑमलेट हा पदार्थ जरी बाहेरून आला असला, तरी आज तो घराघरामध्ये आवडीने खाल्ला जाणारा पदार्थ आहे. आपल्या देशामध्ये कांदा, कोथिंबीर, टोमाटो घालून अंडे फेटून केलेले चविष्ट ऑमलेट आणि त्याबरोबर ब्रेड, अगदी एखाद्या रस्त्यावरील हातगाडीवर देखील मिळते, पण हेच ऑमलेट जेव्हा ‘फ्रेंच ऑमलेट’ बनून आपल्या समोर येते, तेव्हा त्याची ओळख पटणे कठीण होते. फ्रेंच ऑमलेट बाहेरून जरी अगदी सोनेरी होईपर्यंत शिजविले जात असले, तरी त्यातला अंड्याचा बलक मात्र तोंडामध्ये लगेच विरघळेल इतका मुलायम असतो. त्याचप्रमाणे आपल्याकडील ऑमलेट मध्ये वापरले जाणारे कांदा, कोथिंबीर, किंवा इतर मसाले फ्रेंच ऑमलेट बनविताना वापरले जात नाहीत.

ऑमलेट उत्तम बनविता येणे हे खरेतर कौशल्य आहे, आणि ते ज्यामध्ये बनवायचे तो पॅन किंवा तवा ऑमलेट बनविण्यापूर्वी त्यासाठी तयार करणे हे देखील कौशल्यच आहे. हा तवा कधीही पाण्याने धुतला जात नाही, तर केवळ स्वछ कापडाने नीट पुसून घेतला जातो. ह्या तव्याचा किंवा पॅनचा वापर केवळ ऑमलेट बनविण्याच्या कामीच होतो. इतर कोणताही पदार्थ ह्यावर बनविला जात नाही.

स्पेनमध्ये बनविले जाणारे स्पॅनिश ऑम्लेट धिरड्याप्रमाणे दोन्ही बाजूने चांगले शेकून घेऊन बनविले जाते. तसेच ह्यामध्ये बटाटे, सिमला मिरची आणि उन्हामध्ये वाळविलेले ( सन ड्राईड ) टोमाटो घातले जातात. स्पॅनिश ऑमलेट हे फ्रेंच ऑमलेट पेक्षा एकदम वेगळ्या धाटणीचे आहे. तसेच चीन आणि दक्षिण पूर्व आशियामध्ये अंड्याच्या ऑमलेटवजा दिसणाऱ्या पदार्थाला ‘ फुंगी ‘ म्हटले जाते. मॉरीशियस येथे अंडे शिजवून घेऊन त्याचे तुकडे केले जातात, आणि सूपमध्ये घालून खाल्ले जातात.

ऑमलटची विशेषता अशी की हे गरम किंवा थंड दोन्ही पद्धतीने खाल्ले जाऊ शकते. ब्रेडच्या दोन स्लाईसच्या मध्ये घालून तुम्ही ऑमलेट सँडविचसारखे खाऊ शकता, तसेच पराठ्याच्या सोबत अंडे ‘सिंगल फ्राय ‘करूनही खाऊ शकता. तव्यावर ऑमलेट टाकण्यापूर्वी अंडे थोडे फेटून घेण्याची आवश्यकता असते. त्यामुळे त्या मिश्रणामध्ये हवा जाऊन ऑमलेट चांगले मुलायम बनून फुलते. परदेशामध्ये किंवा आपल्याकडील पंचतारांकित हॉटेल्स मध्ये, परदेशी पर्यटकांचे येणे जाणे असल्याने अंड्याचे ऑमलेट विशिष्ट प्रकारे बनविले जाते. इथे ऑमलेट सोबत ‘हॅश ब्राऊन’,किंवा फ्राईड टोमाटो, चिकन सॉसेज, इत्यादी पदार्थांसोबत सर्व्ह केले जाते. त्यासोबत टोस्ट सर्व्ह केला जातो. पण अस्सल हिंदुस्तानी ऑमलेट खाण्याची मजा रेल्वे स्टेशनवरील किंवा आपल्या परिचयाच्या रस्त्यावरील हातगाडीवर, गरमागरम ऑमलेट पाव खाण्यामध्ये आहे, हे मात्र खरे.

Leave a Comment