चला लखनऊच्या ‘नवाबी’ सफरीवर…


उत्तर प्रदेशची राजधानी असलेले नवाबी थाटाचे लखनऊ प्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. नवाबांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लखनऊ मध्ये आजही ही नवाबी संस्कृती, खानपान पाहायला मिळते. अनेक शतकांचा इतिहास असलेल्या, मुघल स्थापत्यशास्त्राचे उत्तम उदाहरण असलेल्या भव्य इमारती, आणि येथे प्रचलित असलेली खाद्यसंस्कृती पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरतात. ह्या ठिकाणी फिरून पाहण्यासारखे, खाऊन पाहण्यासारखे आणि आवर्जून खरेदी करावे असे खूप काही आहे. ह्या शहरात तुम्ही जितके जास्त वेळ राहाल, तितकी जास्त येथील संस्कृतीची खरी ओळख तुम्हाला होईल.

लखनऊमध्ये पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक अशी काही ठिकाणी आहेत, ह्यातील एक प्रसिद्ध ठिकाण म्हणजे ‘बडा इमामबाडा’. असिफ उद्दौल्ला ह्यांनी ह्या इमामबाड्याचे निर्माण करविले होते. दुष्काळाच्या वेळी सामान्य नागरिकांना मदत करता यावी ह्याकरिता ह्या इमाम बाड्याचे निर्माण करविले गेले होते. जर कधी दुष्काळ पडलाच, तर जनतेला इमामबाड्यामध्ये काम मिळत असे, आणि त्यांनी केलेल्या कामाच्या बदल्यात धान्य दिले जात असे. ह्या इमामबाड्याचे भव्य दरवाजे, विशालकाय घुमट, आणि भव्य, सुंदर बगीचे मुघल काळातील समृद्धीच्या खुणा आहेत. येथे ‘भूल भुलैया’ आणि ‘शाही बाव’, म्हणजेच पाण्याची विहीरही आहे.

ज्यांना नवनवीन पदार्थ खाऊन पाहण्यास आवडते, त्यांनी लखनऊची खासियत असलेले ‘टूंडे कबाब’ अवश्य चाखून पाहायला हवेत. तसे पाहिले तर हे कबाब लखनऊ मध्ये अनेक ठिकाणी मिळतात. पण हा पदार्थ अगदी सुरुवातीला ज्या ठिकाणी मिळू लागला, ते दुकान आजही अस्तित्वात आहे. त्यामुळे अगदी ‘ओरिजिनल’ किंवा अस्सल टूंडे कबाब खायचे असतील, तर ह्या दुकानापर्यंत जायलाच हवे. ह्या दुकानापर्यंत पोहोचण्यासाठी लहान लहान गल्ली बोळांमधून वाट काढत पोहोचायला हवे. हे कबाब तयार करण्याची कल्पना कशी सुचली, ह्या मागची कहाणी अशी, की लखनऊच्या एका नबाब साहेबांना दात नव्हते. त्यामुळे त्यांना सहजी खाता यावेत ह्याकरिता हे कबाब खास तयार करण्यात आले. ह्या कबाबांमध्ये १२० प्रकारचे निरनिराळे मसाले वापरण्यात येतात, म्हणूनच हे कबाब येथील खासियत आहेत.

लखनऊ म्हटले, की कपड्यावरील ‘चिकनकारी’ आलीच. कपड्यावरील चिकनकारीचे काम देश-विदेशांत खूपच प्रसिद्ध आहे, आणि ह्याला मागणी ही खूप आहे. अनेक सुंदर रंगांमध्ये आणि तऱ्हे-तऱ्हेच्या कपड्यांवर ही धाग्यांची नाजूक कलाकुसर करण्यात येते. पूर्वीच्या काळी ही कलाकुसर हातांनी केली जात असे. आजकाल ह्या कामी मशीन्सचा वापर होत असतो. मशीन्समार्फत केलेल्या चिकनकारीचे कपडे स्वस्त किंमतीत उपलब्ध असले, तरी हातांनी केलेली अस्सल चिकनकारी आज ही अतिशय महाग किंमतीला उपलब्ध आहे. परदेशातून ह्या चिकनकारीला खूप मागणी आहे.

लखनऊच्या ‘स्ट्रीट फूड’ बद्दल बोलायचे झाले, तर येथील ‘चाट’ अतिशय प्रसिद्ध आहे. येथे जागोजागी चाटच्या गाड्या पाहायला मिळतात. चव आणि क्वालिटीबाबत बोलायचे झाले, तर सर्वच एकमेकांशी स्पर्धा करीत असतात. टिक्की, पाणीपुरी शिवाय लखनऊची ‘टोकरी चाट’ देखील अतिशय प्रसिद्ध आहे. ही चाट तयार करण्याकरिता एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे, मोडविलेले मूग, डाळिंबाचे दाणे, दही, गोड चटणी, पुदिन्याची चटणी, असे सर्व पदार्थ घातले जातात. टोकरी चाट शिवाय मटर चाट, दही वडे, पापडी चाट हे येथील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे.

मुघल स्थापत्यशास्त्राचे आणखी एक उदाहरण म्हणजे लखनऊ येथील ‘रुमी दरवाजा’. ह्या ठिकाणी आल्यावर मुघल काळातील शान काय असेल ह्याची जाणीव झाल्यावाचून राहत नाही. हा भव्य दरवाजा साठ फुट उंचीचा असून, इस्तंबूल येथील एका दरवाज्याच्या नमुन्यावरून ह्या दरवाज्याचे निर्माण केले गेले होते.

Leave a Comment