‘नृत्यसम्राज्ञी’ मृणालिनी साराभाई यांना गुगलची आदरांजली


हैदराबाद – जगप्रसिध्द सर्च इंजिन गुगलने आपल्या मुद्राभिनयासह पदलालित्याने जगाला मोहिनी घालणाऱ्या नृत्यांगणा मृणालिनी साराभाई यांना डूडलच्या माध्यमातून आदरांजली वाहिली आहे. गुगलने साराभाई यांच्या १०० व्या जयंतीच्या निमित्ताने खास डूडल साकारले आहे. त्या टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमध्ये शिकल्या. त्यांनी भरतनाट्यम आणि कथकली नृत्यप्रकारांना जागतिक स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.

मृणालिनी यांचा अंतराळशास्त्रज्ञ विक्रम साराभाई यांच्याशी विवाह झाला. विक्रम आणि मृणालिनी यांचा प्रेमविवाह हा ‘शास्त्र व कलेचा संसार’ होता. १९४८ मध्ये विक्रम साराभाई यांनीच ‘दर्पण नृत्य अकादमी’ स्थापण्यात पुढाकार घेतला. टागोरांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमध्ये धडे गिरवले आणि त्याहीआधी, वयाच्या १२-१३ व्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये बॅलेचेही धडे गिरवले.

‘अम्मा’या नावाने साराभाई या सुपरिचित होत्या. त्यांनी १८ हजारांहून आधिक शिष्यांना नृत्यकलेत पारंगत केले. या व्यासंगी कलायात्रीचा भारत सरकारने पद्मश्री,पद्मभूषण या नागरी पुरस्काराने सन्मान केला. कोलकात्याच्या रवींद्र भारती विद्यापीठाने डी. लिट. तर १९९६मध्ये मध्य प्रदेश सरकारने कालिदास सन्मान देऊन गौरव केला. शांततेच्या नोबेल पुरस्कारासाठी नामांकन मिळवणाऱ्या एक हजार महिलांच्या यादीत मृणालिनी साराभाई यांचा समावेश होता.

Leave a Comment