यंदा सोने गाठणार पाच वर्षांतील सर्वोच्च पातळी


यंदा सोन्याच्या किमतींची पाच वर्षांतील सर्वोच्च पातळी गाठली जाणार असल्याचे भाकीत एका आंतरराष्ट्रीय संशोधन संस्थेने वर्तविले आहे. राजकीय अस्थैर्यामुळे सोन्यामध्ये गुंतवणूक वाढत असल्यामुळे ही वाढ होणार आहे, असे या संस्थेचे म्हणणे आहे.

थॉमसन रॉयटर्स या संस्थेची शाखा असलेल्या जीएफएमएस या संस्थेने गोल्ड सर्व्हे 2018 शीर्षकाचा अहवाल नुकताच प्रकाशित केला आहे. त्यात हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोन्याची किंमत या वर्षी प्रति औंस 1360 डॉलर होईल. काही काळासाठी तो 1500 डॉलरपर्यंतही पोचू शकते, असे तिने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या किमतीच्या तुलनेत ही वाढ 6 टक्के होती. सोन्याच्या किमतीची एवढी पातळी 2013 नंतर गाठली गेली नव्हती.

“अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या राजकारणामुळे, पश्चिम आशियातील परिस्थितीमुळे तसेच ब्रेक्झिटच्या चर्चांमुळे अनिश्चितता आहे. त्याचा परिणाम सोन्याच्या किमती वाढण्यात होईल,” असे या अहवालात म्हटले आहे.

त्याच प्रमाणे चीनची केंद्रीय बँकही पुन्हा सोन्याची खरेदी सुरू करण्याची शक्यता असून त्यामुळे सोन्याच्या मागणीत वाढ होणार आहे. यंदा या क्षेत्राची अधिकृत मागणी 400 पेक्षा अधिक टनांची असेल आणि ही मागणी 2015 नंतरची सर्वाधिक असल्याचे जीएफएमएसने म्हटले आहे.

Leave a Comment