या बेटावर वापरली जात होती दगडी नाणी


माणूस प्राचीन काळापासून चलनाचा वापर करत आहे. सोने, चांदी, मौल्यवान रत्ने, मोती, तांबे, शिसे याचा वापर चलन म्हणून केला जात होता त्यानंतर धातूंची नाणी चलनात आली. कागदी नोटांचा चलन म्हणून वापर सर्वप्रथम चीनमध्ये केला गेला. एका बेटावर मात्र दगडी नाणी वापरत होती आणि ती आजही पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. ती फानायासाठी पॅसिफिक महासागरातील मायक्रोनेशिया भागातील बेटांचा समूह असलेल्या येप येथे जावे लागेल. या बेटांवर ११ हजार लोक राहतात आणि येथे दिवसातून एकाच विमान उतरते.


येथे उतरले कि सर्वप्रथम दाट जंगल, दलदलीची जमीन दिसते आणि आपण प्राचीन काळात आल्याचा भास होतो. विमानतळाच्या बाहेरच रांगेने छोटे मोठे खडक किंवा दगडी शीला ठेवलेल्या दिसतात. त्यांना मधोमध एक भोक पडलेले असते. या शीला म्हणजे या भागाचे पूर्वीचे चलन होय. या भागात दलदल आहे त्यामुळे खडक अथवा पहाड नाहीत. तरीही शेकडो वर्षे येथे दगडी चलन वापरत होते.

असे सांगतात या बेटावरचे लोक नावेतून ४०० किमी दुर असलेल्या पलाऊ बेटावर जाऊन खडक फोडून या शिळा आणत. त्यांना राई म्हणतात. जसा हत्यारांचा शोध लागला तश्या या दगडी नाण्यांना घोटीव रूप आले. १९ व्या शतकात येपवर स्पेनने कब्जा केला. तरीही हा व्यवहार सुरु होता. बोटीतून आणलेले हे खडक सरदारला दिले जात आणि सरदार पाचातील दोन खडक घेई आणि उरलेले तीन आणणाऱ्या माणसाला देत असे. एका दगडी नाण्यासाठी ५० शिंपले या दराने हा व्यवहार होत असे.


आज येथे अमेरिकन डॉलर वापरले जातात तरीही समाजात माफीनामा देणे, लग्नाची बोलणी यासाठी हि दगडी नाणी दिली जातात. या प्रत्येक दगडी नाण्यामागे त्या त्या कुटुंबाचा इतिहास आहे. पुढच्या पिढीला तो आवर्जून सांगितला आणि शिकविला जातो. हि दगडी नाणी इतकी मोठी आहेत कि त्याची चोरी होण्याची अजिबात शक्यता नाही. त्यांचे आता एक संग्रहालय बनविले गेले आहे.

Leave a Comment