वॉलमार्टकडे ‘फ्लिपकार्ट’ची मालकी !


नवी दिल्ली – वॉलमार्ट ई-कॉमर्स क्षेत्रातील फ्लिपकार्ट या भारतीय कंपनीला विकत घेणार असून हा व्यवहार १५ अब्ज डॉलरमध्ये झाल्याची माहिती समोर येत असून वॉलमार्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाउज मॅकमिलन हे देखील भारतात आले आहेत. या कराराबाबत आज अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून फ्लिपकार्ट आणि वॉलमार्टमध्ये चर्चा सुरु होती. अॅमेझॉननेही फ्लिपकार्ट घेण्यासाठी रस दाखवला होता. पण फ्लिपकार्टने अॅमेझॉनऐवजी वॉलमार्टचा प्रस्ताव स्वीकारला. वॉलमार्टचे सीईओ मॅकमिलन यांचे बंगळुरुत आगमन झाले असून ते दिल्लीत प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेऊन या कराराबाबत चर्चा देखील करणार आहेत.

नुकताच फ्लिपकार्टच्या संचालक मंडळाने तिचा ई- कॉमर्स व्यवसाय वॉलमार्टला १५ अब्ज डॉलरला विकण्याचा प्रस्ताव मंजूर केला. या व्यवहारापोटी फ्लिपकार्टच्या प्रवर्तकांना २० टक्के भांडवली लाभ कर देय असेल, असे मानले जाते. फ्लिपकार्ट ७५ ते ८० टक्के हिस्सा विकणार असून त्यापोटी होणाऱ्या लाभापोटी कर भरणे क्रमप्राप्त होईल, असेही सांगितले जाते. कंपनीतील किरकोळ गुंतवणूकदारांकडील १८ लाख समभागांची खरेदी करताना फ्लिपकार्टने ३५ कोटी डॉलर मोजले. परिणामी फ्लिपकार्टचे मूल्य १७.६९ अब्ज डॉलर गणले गेले. वॉलमार्टबरोबर गुगलची अल्फाबेट ३ अब्ज डॉलरच्या गुंतवणुकीसह फ्लिपकार्टकरिता सहखरेदीदार बनली आहे.

Leave a Comment