
नवी दिल्ली : अॅपवरून टॅक्सी बुक करणारी उबर कंपनी उडणारी टॅक्सी या क्षेत्रात पाऊल टाकत असून अमेरिकेतील प्रमुख अंतराळ संघटना नासा सोबत त्यांनी यासाठी हातमिळवणी केली आहे. सामान्य टॅक्सींच्या दरांइतकेच या उडणाऱ्या टॅक्सींचे दर ठेवण्याचा प्रयत्न असल्यामुळे उडणाऱ्या टॅक्सीतून तुम्ही प्रवास केलात तरी तुम्हाला जास्त किंमत मोजण्याची गरज नाही.
नासाच्या मदतीने उबेर आणणार उडणारी टॅक्सी
अंतराळ कायद्याअंतर्गत उबरने नासासोबत दुसरा करार केला आहे. शहरी हवाई वाहतूक सेवा देण्याचे मॉडेल यामध्ये तयार केले जाणार आहे. याबाबतीत उबरने सरकारी यंत्रणेसोबतही काम केले आहे. ‘उबर एअर’ पायलट योजनेत लॉस एंजलसदेखील भागीदार असणार आहे. याआधी डलास फोर्ट-वर्थ, टेक्सास आणि दुबई देखील यात सहभागी झाले आहेत. २०२० पर्यंत अमेरिकेतील काही शहरांत उबर हवाई विमान सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करणार आहे.
नासा या कराराला घेवून उत्साही असल्याचे नासाचे असोशिएट अॅडमिनिस्ट्रेटर जयवॉन शिन यांनी सांगितले. शहरी भागात हवाई टॅक्सी संदर्भातील संशोधन, प्रगती आणि चाचणीसंदर्भातील आव्हानांवर काम केल जात असल्याचेही ते म्हणाले.
