सोशल मीडियावरील मध्यमवयीन व्यक्तींमध्ये नैराश्याचे प्रमाण जास्त


फेसबुक किंवा ट्विटर यांसारख्या सोशल नेटवर्कवर जास्त वेळ घालवणाऱ्या तरुणांमध्ये नैराश्याचे प्रमाण फारसे आढळत नाही, तरमध्यमवयीन व्यक्तींमध्ये मात्र नैराश्याचे प्रमाण जास्त असते, असा निष्कर्ष एका ताज्या संशोधनातून पुढे आला आहे.

वय वर्षे 30 ते49 या गटातील व्यक्ती सोशल मीडियावर अधिक काळ राहिल्याने त्या मानसिक आजाराला जास्त बळी पडतात, तर 50वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्तींची मानसिक अवस्थाही चांगली नसते. मात्र इन्स्टाग्राम व स्नॅपचॅटयांसारख्या सेवांचा वापर करणाऱ्या 18 ते 29 वर्षाच्या लोकांमध्ये चिंता किंवा नैराश्याची लक्षणे आढळत नाहीत. वयाची 30 वर्षे पूर्ण केलेल्या व्यक्ती आपले आयुष्य योग्य प्रकारे चालू आहे की नाही, याची चिंता करतात आणि आपल्या समवयीन लोकांच्या आयुष्याशी तुलना करतात असे या पाहणीत आढळले

टेम्पल युनिव्हर्सिटी या अमेरिकेतील विद्यापीठातील संशोधक डी. ब्रुस हार्डी यांनी कम्प्युटर्स इन ह्यूमन बिहेव्हियर या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध केले आहे. “मध्यमवयीन व्यक्ती आपल्या शालेय काळातील मित्र किंवा अन्य व्यक्तींच्या जीवनाशी आपली तुलना करतात व आपण काय मिळवले हे ठरवतात. परंतु अशी तुलना करणे चुकीचे आहे कारण त्यामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास डगमगतो व मानसिक आरोग्य ढासळते,” असे त्यांनी लिहिले आहे

सोशल मीडियाचा वापर करणाऱ्या 22 टक्के व्यक्ती नर्व्हस ब्रेकडाऊनला बळी पडतात, मात्र 18 ते 19 वर्षे वयोगटातील तरुणांमध्ये ही लक्षणे दिसून आले नाहीत, असेही त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment