ह्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवणे टाळा


वस्तू टिकून राहाव्या ह्यासाठी आपण त्या फ्रीजमध्ये ठेवत असतो. भाज्या, फळे, दुध इत्यादी पदार्थ बाहेर ठेवल्याने लवकर खराब होतात. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये हे पदार्थ अधिक लवकर खराब होतात. हे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्याने जास्त काळ ताजे राहतात. डाळी, बेसन, रवा, निरनिराळी पीठे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यामध्ये कीड लागत नाही. पण काही पदार्थ असे आहेत, जे फ्रीजमध्ये ठेवणे आवर्जून टाळायला हवे.

कॉफी पावडर फ्रीजमध्ये ठेवणे टाळा. फ्रीजमध्ये ठेवल्याने कॉफी फ्रीजमधील इतर वस्तूंचा गंध अवशोषित करते, आणि लवकर खराब होते. जर कॉफी जास्त काळ फ्रीजमध्ये ठेवली तर काही काळानंतर तिची चव आणि वास दोन्ही बदलतात. त्याचप्रमाणे मध ही फ्रीजमध्ये ठेऊ नये. मधामध्ये आधीपासूनच प्रीझर्व्हेटीव्हज् असतात. त्यामुळे मध बाहेरही टिकून राहतो. जरी मध अनेक वर्षे बाहेरच घट्ट झाकणाच्या बरणीत साठविला असला, तरी तो तसाच टिकून राहतो. फ्रीजमध्ये ठेवल्याने मधात खडे, किंवा क्रिस्टल्स तयार होतात.

लोणची फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे. लोणचे टिकून राहावे ह्यासाठी त्यामध्ये ते तयार करतानाच भरपूर तेल आणि मीठ घातलेले असते. हे दोन्ही पदार्थ लोणचे टिकवून ठेवण्यास सहायक आहेत. काही वेळा लोणच्यामध्ये व्हिनेगरही घातले जाते. त्यामुळे ही लोणचे अधिक काळ टिकून राहते. त्यामुळे लोणचे फ्रीजमध्ये ठेवण्याची आवश्यकता नसते. काही लोणची त्या त्या फळांच्या किंवा भाज्यांच्या हंगामामध्ये बनविलेली असतात. ही लोणची मात्र त्वरित खाण्याची असतात. ही लोणची जास्त काळ टिकत नाहीत.

केळी फ्रीजमध्ये ठेवल्याने जलद गतीने काळी पडू लागतात. केळी बाहेरच ठेवावीत, तसेच केळी लवकर काळी पडू नयेत, किंवा लवकर पिकून खराब होऊ नयेत म्हणून त्यांच्या देठांना प्लास्टिक किंवा अल्युमिनियम फॉइल गुंडाळून ठेवावी. टोमॅटो देखील अधिक काळ फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यांची चव खराब होते. त्यामुळे आपल्या आवश्यकतेनुसार टोमॅटो खरेदी करावेत आणि फ्रीजमध्ये न ठेवता बाहेरच ठेवावेत. त्याचप्रमाणे कांदे, लसूण आणि बटाटे देखील फ्रीजमध्ये ठेऊ नयेत.

लिंबे, संत्री, मोसंबी यांसारखी आंबट फळे फ्रीजमध्ये ठेऊ नयेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने ह्यांचा रस आतल्याआत वाळून कमी होऊ लागतो. त्याचप्रमाणे न कापलेले कलिंगड फ्रीजमध्ये ठेऊ नये. फ्रीजमध्ये ठेवल्याने कलिंगडातील अँटी ऑक्सिडंटस् कमी होऊ लागतात. खोबरेल तेल, किंव ऑलिव्ह ऑइल सारखी तेले फ्रीजमध्ये ठेऊ नयेत. फ्रीजमध्ये ठेवल्याने ह्या तेलाची घनता आणखीनच वाढते. तसेच फ्रीजमधून काढल्यानंतर पुनश्च सामान्य तापमानावर येण्यासाठी ह्या तेलांना खूप वेळ लागतो.

Leave a Comment